शाहजहाँपूर (उत्तरप्रदेश) : येथील महामार्गाच्या रूंदीकरणासाठी कचियानी खेडाजवळ असलेले हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हे मंदिर पाडणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
येथील राष्ट्रीय महामार्ग २४ च्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. येथे हनुमानाचे एक मंदिर आहे. रस्त्याच्या रूंदीकरणासाठी हे मंदिर पाडण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी मोठमोठी यंत्रे आणून मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आश्चर्य म्हणजे हे मंदिर पाडतांना कधी यंत्रात तरी बिघाड होत होता किंवा कधी जनरेटरच काम करत नव्हते. यानंतर रस्ते बनवणार्या आस्थापनेने मंदिराजवळ पूजा केली आणि मंदिर दुसरीकडे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंदिरातील श्री हनुमानाची मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही ती मूर्ती जराही हलली नाही. मूर्ती हलवण्यासाठी आणलेले यंत्रच खराब झाले.
या घटनेनंतर मात्र स्थानिकांची या मंदिराप्रती आणि हनुमानावरची श्रद्धा आणखीनच दृढ झाली. त्यांनी हे मंदिर पाडण्यास तीव्र विरोध दर्शवला, तसेच ते पाडण्याचा पुन्हा प्रयत्न केला, तर आंदोलन करण्याची चेतावणी दिली. यामुळे हे मंदिर पाडण्याचे काम सध्या थांबण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात