प्रकाश आंबेडकर यांची मुक्ताफळे
कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली आहे. अभिवादन आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये झालेली जाळपोळ मराठा-दलित समाजाने केली नाही, तर देशाचे राजकारण कह्यात ठेवण्यासाठी अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे. त्याकडे केंद्र आणि राज्य शासन दुर्लक्ष करत आहे, अशी मुक्ताफळे भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १३ जानेवारीला येथील विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उधळली. (राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर धादांत खोटे आरोप करून जातीजातींत तेढ निर्माण करू पहाणारी विधाने करणार्यांवरच सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रकाश आंबेडकर यांची विधाने
१. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी पुणे, चाकण आणि शिरूर असे ३ मार्ग आहेत. त्यापैकी पुणे वगळता चाकण आणि शिरूर मार्गावरून येणार्या भीमसैनिकांना मारहाण केली. तत्पूर्वी गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरून वाद निर्माण होत होता. त्या वेळी ३९ जणांवर गुन्हा प्रविष्ट करून ९ जणांना सोडून दिले; मात्र मारहाण झालेल्या घटनेची पोलिसांनी नोंदही करून घेतली नाही.
२. या विरोधात २ जानेवारीला गावांतून समाज बाहेर पडला. ३ जानेवारीला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागावे, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.
३. महाराष्ट्र बंदच्या वेळी काही कार्यकर्त्यांवर दरोड्याचे आणि ३०७ कलम लावले. पोलिसांचा हा आततायीपणा आहे. यातून कार्यकर्त्यांची निश्चित सोडवणूक केली जाईल. यासाठी सरकारलाही लक्ष घालावे लागेल. भारतात पाकिस्तानप्रमाणे अंतर्गत यादवी निर्माण होऊ नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनातील वर्चस्ववातून निर्माण होणार्या हाफीज-सय्यद यांना पायबंद घालवा अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दंगल घडवली असती, तर अशी धमकी देण्याचे धाडस कुणाचे झाले असते का? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. देशासमोर आज मोठे संकट असून यातून यादवी होण्याची शक्यता आहे. यातून १ जानेवारीला हिंसक घटना घडली. अशा घटनामध्ये आततायीपणा केला, तर निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता असल्याने नियंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटना आपला अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर ३ जानेवारीला कोल्हापूर येथे वाहनांची मोठी तोडफोड झाल्याने अनेक नागरिकांची मोठी हानी झाली होती. प्रकाश आंबेडकर येथे आल्यानंतर प्रथम तेे सिद्धार्थनगर येथे भेट देणार होते; कारण तेथे आंबेडकरवादी अनुयायी अधिक आहेत; मात्र पोलिसांच्या विनंतीवरून त्यांनी तेथे भेट दिली नाही. तथापि, शहरातील महाद्वार रस्ता, शाहूपुरी, दसरा चौक आदी ठिकाणी आंबेडकरवादी अनुयायांनी केलेल्या तोडफोडीची त्यांनी पाहणी केली नाही. यावरून त्यांना इतर ठिकाणी झालेल्या तोडफोडीविषयी कोणतीच सहानुभूती नसल्याचे स्पष्ट होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात