पणजी : गोव्यात गेली १० वर्षे गोवंश रक्षणाचे कार्य गोवंश रक्षा अभियानच्या माध्यमातून चालू आहे. वैध मार्गाने चालू असलेली ही चळवळ पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दडपून टाकण्याचा प्रयत्न गोव्यातील भाजप शासनाकडून पुन: पुन्हा केला जात आहे. गोरक्षकांवर खोटे खटले दाखल करून दुसर्या बाजूने अवैध गोवंश हत्या करणार्यांना रान मोकळे ठेवले जात आहे, असा आरोप गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी गोप्रेमी साहित्यिक श्री. आनंद मयेकर, वाळपई येथील गोसंवर्धन केंद्राचे गोसेवक श्री. पुंडलिक भूते, भारतमाता संघटनेचे श्री. शैलेद्र वेलिंगकर उपस्थित होते.
श्री. परब पुढे म्हणाले, गोव्यातील केवळ १५ टक्के लोक गोमांस खाणारे आहेत. हे सत्य लपवून गोव्यात मोठ्या प्रमाणात गोमांस खाणारे लोक आहेत, हा भ्रम पसरवला जात आहे. गोवंश रक्षणासाठी गोवंश रक्षा अभियानाने आतापर्यंत वैध मार्गाने लढा दिला आहे. गोवा मांस प्रकल्पातील अवैध गोवंश हत्या रोखण्यासाठी गोवंश रक्षा अभियानने वर्ष २००७ मध्ये याचिका दाखल केली. गोवंश रक्षा अभियानच्या गोरक्षकांनी प्राण धोक्यात घालून गोवंश हत्येचे अवैध प्रकार रोखले आहेत. मी तसेच अमृतसिंह आणि रामा परब यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. राज्यातील अवैध गोवंश हत्या थांबावी, यासाठी गोवंश रक्षा अभियान आणि गायत्री परिवार यांनी उच्च न्यायालयात खटले दाखल केले आहेत. असे असतांना राज्याचे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी गोरक्षकांना गुन्हेगार ठरवत आहेत. गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करून त्यांच्यावर भाजपकडून कोणताही राजकीय दबाव नाही, हे स्पष्ट केले पाहिजे. तसेच मनोहर पर्रीकर यांना गायीच्या महत्त्वाविषयी शिक्षण दिले पाहिजे. गोवंशाची हत्या करणार्यांना देहदंडाची शिक्षा देण्यासाठी कायदा करावा, या मागणीचा पुनरुच्चार गोवंश रक्षा अभियानच्या वतीने या वेळी करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments