राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने मोहरी खुर्द, भोर (जिल्हा पुणे) येथे रणरागिणी शाखेच्या वतीने व्याख्यान
पुणे : सध्याच्या स्थितीत राष्ट्र-धर्म संकटात असतांना प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन शौर्य निर्माण केले पाहिजे. केवळ मनगटात बळ असून चालणार नाही, तर मनही कणखर असायला हवे. प्रत्येक स्त्रीने धर्माचरण करून आत्मबळ वाढवणे महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक स्त्रीने येणार्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शौर्यशाली घडवून पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले. मोहरी खुर्द येथील पद्मावती तरुण मंडळ यांनी १२ जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने भोर तालुक्यातील ६० महिलांचा आदर्श माता म्हणून सन्मान केला. या कार्यक्रमाला डॉ. ज्योती काळे यांना नारी सबलीकरण या विषयावर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते.
या वेळी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. भोर तालुक्याच्या तहसीलदार सौ. वर्षा शिंगण या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. ज्योती काळे यांचा सत्कार मोहरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रत्नाबाई सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांचाही सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे सदस्य श्री. विश्वास ननावरे, भोर पंचायत समिती सदस्य श्री. रोहन बाठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. विक्रम खुटवड, वरवे खुर्द गावचे उपसरपंच श्री. महिंद्र बोर्डे, तसेच पद्मावती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांसह २२५ हून अधिक जण उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आदर्श माता म्हणून सन्मानचिन्ह देतांना मंडळाने प्रत्येक महिलेला सन्मानचिन्हासमवेत सनातनचे धर्मशिक्षण देणारे प्रत्येकी २ लघुग्रंथ भेट म्हणून दिले.
२. सनातनचे एकूण १०० लघुग्रंथ मंडळाने विकत घेतले होते.
३. या वेळी धनकवडी, पुणे येथे ४ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रणही सर्वांना देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात