धर्मभास्कर विनायक मसुरकर महाराज यांच्या गोरेगाव येथील मसुराश्रमातील हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुंबई : ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आदर्श गुरुकुल पद्धतीकडे स्वातंत्र्यानंतर भारतियांनी दुर्लक्ष केले आणि इंग्रजांची कुटील मेकॉलेे शिक्षणपद्धत जवळ केली. परिणामी सुशिक्षित आणि बुद्धीजीवी समाज राष्ट्र अन् धर्म यांविषयी उदासीन राहिला. यामुळेच देशात धर्माची नित्य हानी होत आहे आणि अन्य छोटी राष्ट्रे भारताला धमकावत आहेत. याचा सामना करण्यासाठीच धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्यांनी त्याला साधनेची जोड दिल्यास आत्मोन्नत्तीसह राष्ट्र-कार्यही परिणामकारक करता येईल, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. गोरेगाव (पूर्व) येथील धर्मभास्कर विनायक मसुरकर महाराज यांच्या मसुराश्रम येथे १४ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते. या सभेला वीरसेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल, भाजपचे श्री. संदीप सिंग, योग वेदांत सेवा समितीचे साधक, शिवसेनेचे कार्यकर्ते यांसह बहुसंख्य राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. मसुराश्रमाचे श्री नारायण महाराज यांनी सभेच्या प्रारंभी शंखनाद केला. या सभेनंतर उपस्थित धर्मप्रेमींनी ५ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
‘हिंदु राष्ट्र’ ही राजकीय घोषणा नव्हे, तर ईश्वराचे वचन ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु राष्ट्र’ ही राजकीय घोषणा नव्हे, तर ईश्वराचे वचन आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्या वीरांनी याविषयी आश्वस्त रहावे. जगातील सर्वच राष्ट्रे ही त्या देशातील धर्मावर आधारित आहेत. ते आपल्या धर्मबांधवांचे रक्षण करतात; मात्र भारतात धर्मनिरपेक्षतेच्या गोंडस नावाखाली बहुसंख्य हिंदूंवर अन्याय करून अन्य धर्मियांचे लांगूलचालन केले जाते. मुळात सहिष्णु असलेल्या हिंदूंच्या हे मुळावर आले आहे. यातून सावरण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव उपाय आहे.
धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बैठक
स्थळ : मसुराश्रम, पांडुरंग वाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई
वेळ : सायंकाळी ७.३०
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात