कोपरखैरणे (नवी मुंबई) : माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वामी विवेकानंद असोत, तिघांमध्ये एकच समान धागा होता, तो म्हणजे हिंदु धर्माचे आचरण करून यांनी केवळ स्वतःसाठी न जगता प्रत्येक परिस्थितीवर चोखपणे मात करून धर्माचे, सत्याचे राज्य स्थापित केले, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिज्ञासा पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. सुधीर थळे, प्रा. प्रताप महाडिक, प्रा. सुरेंद्र पारवे, प्रा. संदीप मेहतर, प्रा. दिलीप जांभळे आणि प्रा. पाटील मॅडम हे मान्यवर उपस्थित होते.
‘तुम्ही हिंदु धर्माचा परिपूर्ण अभ्यास केला आहे का ?’, असे प्रा. रवींद्र पाटील यांनी विचारताच एकानेही हात वर केला नाही. त्या वेळी त्यांनी ‘हा विवेक विवेकानंदानी हिंदु धर्माचा अभ्यास करून प्राप्त केला. त्यामुळे आपण आपल्या महापुरुषांचे गुण शिकूया आणि प्रगती करूया’, असे सांगितले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे हिंदु धर्माचे ब्राह्मतेज आणि ज्वलंत क्षात्रतेज घेऊन सिद्ध होऊया ! – सौ. नयना भगत
हिंदुस्थानवर संकटे आभाळासारखी तुटून पडली आहेत. ‘तोडा आणि फोडा’ ही नीती ओसंडून वहात आहे. अशा वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे हिंदु धर्माचे आचरण करून आपल्या संस्काराने घराघरात शिवबा घडायला हवेत, तरच आपला जन्म यशस्वी होईल !
साहाय्य
या कार्यक्रमासाठी सर्वश्री राहुल यादव, राहुल सुर्वे, अंकुश चिकने, संतोष गोरे, नयन कोकणे यांनी परिश्रम घेतले, तसेच चिकनेश्वर मंदिराचे व्यवस्थापक श्री. नीलेश पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि श्री गणेश डेकोरेटर्सचे श्री. गणेश बगाटे यांनीही साहाय्य केले.
अभिप्राय
१. अतिशय सुंदर विचार मांडले. ही काळाची आवश्यकता आहे. आपण घरचेच आहात, यासाठी आभार मानत नाही ! – प्रा. दिलीप जांभळे
२. हा कार्यक्रम माझ्यासाठी घरातीलच आहे ! – प्रा. रवींद्र पाटील
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात