हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरण
पुणे : हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावर दोन्ही पक्षांच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद १५ जानेवारीला पूर्ण झाला. पुढील सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी १८ जानेवारीला ठेवली आहे.
१. या वेळी शासकीय अधिवक्त्या उज्ज्वला पवार यांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, देसाई यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता जामीन देण्याचा प्रश्नच येत नाही.
२. वरील युक्तीवादावर जोरदार प्रतिवाद करतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी जामीन नाकारल्यानंतरही आतापर्यंत या खटल्यातील १७ जणांना जामीन मिळालेला आहे. ही पालटलेली परिस्थिती आहे, तसेच ‘धनंजय देसाई यांना या खटल्यातून आरोपी म्हणून वगळावे’, या विषयासाठी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २ न्यायमूर्तींपुढे सुनावणी झाली आहे. त्या वेळी त्यांनी ‘प्रथमदर्शनी पुरावे नाहीत’, असे मत व्यक्त करत देसाई यांच्या विरोधातील खटल्याच्या सुनावणीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे ते मतही विचारात घेणे आवश्यक आहे. जामिनाचे निकष पहाता त्यावर विचार होणे आवश्यक आहे.
३. शासकीय अधिवक्त्यांनी लेखी म्हणणे सादर करण्यास २ दिवसांची मुदत मागून घेतली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात