आझादी बचाओ आंदोलनाचे संस्थापक तथा भारत स्वाभिमान ट्रस्टचे महासचिव स्व. राजीव दीक्षित यांचेही काही वर्षांपूर्वी अचानक निधन झाले होते. त्या वेळीही त्यांच्या निधनाविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता. आता डॉ. तोगाडिया यांच्याविषयी घडलेल्या प्रसंगावरून पुन्हा तसेच षड्यंत्र रचण्यात आलेले नव्हते ना, अशी शंका हिंदूंना आल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कर्णावती : माझे ‘एन्काउंटर’ (ठार मारणे) करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप विश्व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू ऐक्यासाठी काम करत असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. वेळ आल्यावर या सर्व गोष्टींविषयी खुलासा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. तोगाडिया हे १५ जानेवारीला सकाळपासून बेपत्ता होते. त्या दिवशी सायंकाळी ते शाहीबाग परिसरात बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब न्यून झाल्याने ते बेशुद्ध पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तथापि डॉ. तोगाडिया यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था असतांना ती न घेता ते कुठे गेले होते ?, हे मात्र अस्पष्टच होते. डॉ. तोगाडिया हे बेशुद्ध पडल्याच्या घटनेविषयी तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यामुळे १६ जानेवारीला डॉ. तोगाडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले की,
१. १५ जानेवारीला पूजा करतांना एका व्यक्तीने खोलीत येऊन राजस्थान अन् गुजरात पोलीस माझे ‘एन्काउंटर’ करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. मी विश्वास ठेवला नाही; परंतु काही वेळातच मला एका व्यक्तीने दूरभाष करून त्याविषयी सांगितले.
२. मी मृत्यूला घाबरत नाही; परंतु काही घडले आणि त्याचे पडसाद देशात उमटल्यास बिकट परिस्थिती निर्माण होईल, हे लक्षात घेऊन मी बाहेर निघालो.
३. मी रिक्शात बसलो. पोलिसांना ओळखू न येण्यासाठी शॉल शरीराभोवती गुंडाळली. मी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भ्रमषभाष केला; परंतु त्यांना वॉरंटविषयी ठाऊक नव्हते. अधिवक्त्यांनी वॉरंट रहित होणार नसल्याचा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले.
४. जयपूरला जाऊन न्यायालयापुढे उपस्थित व्हायचे, असे ठरवून मी विमानतळाच्या दिशेने निघालो. मला भरपूर घाम आला, मी खाली पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा मी रुग्णालयात होतो.
५. राजस्थान किंवा गुजरात पोलिसांविरुद्ध माझी कुठलीही तक्रार नाही; पण त्यांनी राजकीय दबावाखाली येऊ नये, तसेच कुणीही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये.
६. मी न्यायव्यवस्थेचा अवमान केलेला नाही. मी गुन्हेगार नाही. जेव्हा आधुनिक वैद्य मला अनुमती देतील, तेव्हा जयपूरला न्यायालयात उपस्थित राहीन.
७. मी राममंदिर, गोरक्षा, शेतकरी आणि युवकांसाठी एकटाही कायम लढत राहीन.
विहिंपचे कार्यकर्ते संतप्त
डॉ. तोगाडिया यांच्या विरोधात १० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात गंगापूर जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. ‘डॉ. तोगाडिया आजारी असतांनाही गुजरात आणि राजस्थानच्या पोलिसांनी त्यांना अटक केल्याचा आरोप विहिंपने १५ जानेवारीला केला. डॉ. तोगाडिया यांना पोलिसांनी अटक केलेली नाही, असा खुलासा सहपोलीस आयुक्त जे. के. भट्ट यांनी केला. डॉ. तोगाडिया यांच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनी ४ पथके स्थापन केली. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या विहिंपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.