Menu Close

‘सामाजिक प्रसारमाध्यम’रूपी (‘सोशल मीडिया’रूपी) आयुधाच्या सकारात्मक वापराद्वारे अध्यात्मप्रसार शक्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वाराणसी : ‘सामाजिक प्रसारमाध्यम’रूपी (‘सोशल मीडिया’रूपी) आयुधाच्या सकारात्मक वापराद्वारे अध्यात्मप्रसार करणे शक्य आहे, असे मार्गदर्शनपर उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे काढले.

भोपाळ येथील ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालय’ आणि सारनाथ (वाराणसी) येथील ‘महाबोधी विद्यार्थी परिषद’ यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘अध्यात्म का विस्तार तथा सोशल मीडिया’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे बोलत होते. सारनाथ येथील ‘महाबोधी विद्या परिषदे’च्या सभागृहात येथे १३ आणि १४ जानेवारीला हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालया’चे कुलपती प्रा. बृज किशोर कुठियाला, सारनाथ (वाराणसी) येथील ‘महाबोधी विद्या परिषदे’चे अध्यक्ष प्रा. राम मनोहर पाठक, ‘महाबोधी सोसायटी’चे सहसचिव पू. (डॉ.) के. मेधांकर थेरोजी, जौनपूर येथील पूर्वांचल विश्‍वविद्यालयाचे प्रा. डॉ. राजा राम यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात विविध भागांतील शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक, पत्रकार, तसेच विद्यार्थीही सहभागी झाले होते.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘आपला प्रवास हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे झाला पाहिजे. आपली शारीरिक, बौद्धिक, आत्मिक आणि चित्त शुद्धी होणेही आवश्यक आहे. हल्लीच्या प्रसारमाध्यमांचे धोरण पक्षपाती आहे. त्यांच्या या पक्षपातीपणाचा रोष लोकांकडून सामाजिक प्रसारमाध्यमांवर व्यक्त केला जातो.’’

अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार ही एक चळवळ मानून ती राबवा ! – प्रा. बृज किशोर कुठियाला

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालया’चे कुलपती प्रा. बृज किशोर कुठियाला म्हणाले, ‘‘सामाजिक प्रसारमाध्यमाने (‘सोशल मीडिया’ने) समाजाला मानवतेशी जोडले आहे. अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार ही एक चळवळ मानून आपण सर्वांनी ती राबवायला हवी. यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा चांगला उपयोग केला पाहिजे.’’

सोशल मीडिया वापरणार्‍यांचा विवेक कोण जागृत करणार ? – प्रा. राम मनोहर पाठक

या प्रसंगी ‘महाबोधी विद्या परिषदे’चे अध्यक्ष तथा या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे प्रणेते प्रा. राम मनोहर पाठक यांनी त्यांच्या भाषणात सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सोशल मीडिया वापरणार्‍यांचा विवेक कोण जागृत करणार ? सोशल मीडिया हा समाजाचा रक्षणकर्ता आहे. तथापि या रक्षणकर्त्याचे रक्षण करणे, हेही शेवटी समाजाचेच दायित्व आहे.

‘महाबोधी विद्या परिषदे’चे अध्यक्ष प्रा. राम मनोहर पाठक यांनीही या संमेलनात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे आदरपूर्वक स्वागत केले.

प्रा. बृज किशोर कुठियाला यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालया’चे कुलपती प्रा. बृज किशोर कुठियाला यांनी त्यांच्या भाषणात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘‘केवळ ५ दिवसांमध्येच सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली. त्यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण वातावरणच आध्यात्मिक बनले.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *