जळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे (दिनांकानुसार) औचित्य साधून १२ जानेवारी या दिवशी भुसावळजवळील शिवपूर या गावात स्थानिक जय श्रीराम ग्रुप आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांना प्रिय असलेल्या ‘उठा, जागे व्हा, लक्ष्य गाठेपर्यंत थांबू नका’ या उक्तीनुसार हिंदु राष्ट्राचे लक्ष्य गाठेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ६५० हून अधिक धर्मनिष्ठ नागरिकांनी केला. या सोहळ्याला समितीचे श्री. प्रशांत जुवेकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी संबोधित केले, सूत्रसंचालन श्री. शशिकांत सुरवाडकर यांनी केले.
सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण आणि धर्माचरण यांची आवश्यकता’, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या सोहळ्यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आसपासच्या ५-६ गावांत करण्याचे दायित्व घेतले.
क्षणचित्रे
१. प्रवचनानंतर झालेल्या आढावा बैठकीला १३० हून अधिक जण थांबले होते. त्यांनी यापुढे गावातील धार्मिक सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याचे ठरवले.
२. प्रवचनाला उपस्थित असलेल्यांपैकी काही युवक म्हणाले, ‘‘आम्ही लहानपणापासून गावात अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पाहिले; पण आजचा हा कार्यक्रम वेगळाच होता. असा कार्यक्रम आम्ही कधीच पाहिला नव्हता. पुष्कळ उत्साह जाणवत आहे.’’
३. गावातील काही ज्येष्ठ मंडळींनीही सांगितले की, असे कार्यक्रम गावात ३-६ मासांतून एकदा होत राहिले, तर गावातील वातावरण चांगले राहिल. एकोपा आणि धार्मिकता टिकून राहिल.
४. शिवपूरमधील या कार्यक्रमाला कन्हाळा, खेडी आणि मोंढाळा या गावातील धर्मप्रेमी उपस्थित होते.
धर्मप्रेमींचा हा त्याग हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
शिवपूर गावात ३५-४० युवकांनी ‘जय श्रीराम’ नावाचा एक गट बनवला आहे. त्या माध्यमातून ते गावात श्रीरामजयंतीच्या उत्सवासह अन्यही धार्मिक-सामाजिक कार्यक्रम वर्षभर घेत असतात. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गावात धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यावर या गटातील मुलांना समितीच्या कार्याची ओळख झाली. त्यांनीच गावात अशा प्रकारे प्रवचन आयोजित करण्यात पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या गटातील बहुतेक सर्व जण हे दुकानात रोजंदारीने काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही या गटातील ३० हून अधिक जणांनी प्रवचनाच्या दिवशी सेवेसाठी सुटी घेतली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात