चेन्नईमध्ये हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक
चेन्नई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील कालीगंबाल मंदिरात हिंदूंच्या हितासाठी लढणार्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. तमिळनाडू अधिवक्ता सेनेचे अध्यक्ष अधिवक्ता एझुमलाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बार कॉन्सिलचे उपाध्यक्ष आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक राज्याचे प्रतिनिधी अधिवक्ता अमृतेश एन्. पी., सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता, तसेच हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे विष्णु जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. २० अधिवक्त्यांसहित हिंदु महासभा आणि शिवसेनेचे एकूण ४० धर्माभिमानी या बैठकीला उपस्थित होते.
१. हिंदूंच्या मागण्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यावर भर द्यायला हवा, असे मत अधिवक्ता जैन यांनी यावेळी व्यक्त केले. न्यायालयाला हिंदूंच्या मागण्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
२. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शासन अथवा हिंदुद्रोह्यांच्या कृत्यांची माहिती काढण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करण्याविषयी उपस्थित अधिवक्त्यांचे प्रबोधन केले. यामुळे आपण लढत असलेल्या न्यायालयीन लढ्यांना बळ मिळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.
३. अधिवक्ता अमृतेश एन्. पी. यांनी ख्रिस्तीप्रचारक बेन्नी हीन आणि हिंदुद्वेषी झाकिर नाईक यांच्या कर्नाटक राज्याच्या दौर्यावर लादण्यात आलेल्या बंदीमागे अधिवक्त्यांचे संगठन हेच कारण होते, असे सांगितले.
धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना मिळालेले यश
अधिवक्त्यांना मिळालेल्या यशाविषयी बैठकीत पुढील माहिती देण्यात आली –
१. अधिवक्ता विष्णु जैन यांचे वडील अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीत श्रीरामाची पूजा करण्यासंदर्भातील खटला जिंकला.
२. महाराष्ट्रातील शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात होत असलेल्या भक्तांच्या अर्पण रूपातील धनाचा अपव्यवहार माहितीच्या अधिकाराचा वापर करून उघड करण्यात हिंदु विधीज्ञ परिषदेला यश मिळाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात