मुंबई : जर २५ जानेवारीला ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर देशभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना चित्रपटाच्या विरोधात मैदानात उतरतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो; मात्र करणी सेना कोणत्याही परिस्थितीत देशात ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी करणी सेनाप्रमुख लोकेंद्रसिंह कालवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांत ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती; मात्र १८ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने ‘हा चित्रपट देशात सर्वत्र प्रदर्शित होऊ शकतो’, असा आदेश दिला आहे. यावर करणी सेनेने १९ जानेवारीला बोरीवली येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. या वेळी महाराणा प्रताप बटालियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. रघुनाथ सराणा यांसह करणी सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री. लोकेंद्रसिंह कालवी म्हणाले, ‘‘जोधा-अकबर’ हा चित्रपट देशात सर्वत्र प्रदर्शित झाला; मात्र राजस्थानमध्ये प्रदर्शित झाला नाही. आम्ही इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही. इतिहासावर बनलेल्या प्रत्येक चित्रपटावर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे नियंत्रण असायला हवे. हिंदु धर्माच्या सन्मानासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र यावे.’’ जनतेचे न्यायालय मोठे असून त्यांचा आवाज ऐकावा, असे मत अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात