‘वीर जीवा महाले’ पुरस्काराने बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे सन्मानित !
कोल्हापूर : देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली. किंबहुना माणूस आपल्या मनानेच जीवसृष्टीची रचना करू पहात आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित लोकांकडूनच सर्वाधिक हानी होत आहे. यामुळे शालेय शिक्षणात गायींना तारण्याचे शिक्षण देणे काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले.
शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार कोल्हापूर बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी उपाख्य बंडा साळुंखे यांना नुकताच प.पू. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. या वेळी विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री. साळुंखे यांसह त्यांची पत्नी सौ. गौरी यांचाही सत्कार करण्यात आला.
प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आणि शिवप्रतापदिन उत्सव समितीचे श्री. मिलिंद एकबोटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी सौ. गौरी साळुंखे यांचा सत्कार सौ. मयुरी उरसाल यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. मिलिंद एकबोटे म्हणाले की, शिवप्रतापदिन राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राज्य शासनाने घोषित करावा. बजरंग दलाने शिवचरित्र अभ्यासवर्ग चालू करावे, असे त्यांनी आवाहन केले.
उपस्थित मान्यवर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. मुकुंद भावे, बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, पर्यावरण तज्ञ श्री. उदय गायकवाड, श्री. दिलीप देसाई, शिवसेनेचे श्री. किशोर घाडगे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. दुर्गेस लिंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. श्रीकांत पोतनीस, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात