राष्ट्रप्रेमी नागरिकांनी काढली पेडण्यात भव्य पदयात्रा
पेडणे : पर्यटन खात्याने येथे ३ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या पोर्तुगिजांच्या कार्निव्हलला राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. येथे २० जानेवारी या दिवशी नानेरवाडा क्रीडामैदान ते पेडणे बाजारपेठ मार्गावरून काढण्यात आलेल्या पदयात्रेत अनेक राष्ट्राभिमानी सहभागी झाले होते. पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे त्यांनी आणलेला बीभत्स कार्निव्हल साजरा करणे म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच आहे. त्यामुळे पोर्तुगिजांचा कार्निव्हल पेडण्यात नकोच !, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
भारत माता की जय संघटनेचे श्री. संजय शिरगावकर, मगोचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. राघोबा गावडे, अधिवक्ता अमित सावंत, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक समितीचे निमंत्रक श्री. गजानन मांद्रेकर हे पदयात्रेत सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी या वेळी विषय मांडला. पेडण्यात होऊ घातलेल्या कार्निव्हल विषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीच्या वतीने ठिकठिकाणी शांततापूर्ण पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी या दिवशी मोरजी येथे अशाच प्रकारची पदयात्रा काढून कार्निव्हलला विरोध दर्शवण्यात आला होता.
राष्ट्रप्रेमी नागरिक समितीचे श्री. गजानन मांद्रेकर म्हणाले, वर्ष २०१४ मध्ये विधानसभा अधिवेशनाच्या काळात कार्निव्हलचे आयोजन झाले होते. कार्निव्हलच्या दिवशी विधानसभा अधिवेशन नको, अशी मागणी त्या वेळी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी हा धार्मिक सण नसल्याने अधिवेशन होणार असल्याचे स्वत:सांगितले होते. कार्निव्हलला धार्मिक आधार नाही. राष्ट्रप्रेमी नागरिक समिती कार्निव्हलविषयी धार्मिक कलह निर्माण करत नाही; मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी कार्निव्हलचे आयोजन झाल्याने धार्मिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.
या वेळी नागरिकांनी पेडण्यात कार्निव्हल होऊ देणार नाही, असा ठराव संमत केला. कार्निव्हलमध्ये अर्धनग्न महिलांचा सहभाग असतो. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आमचा कार्निव्हलला विरोध आहे, असे रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांनी सांगितले.
भारत माता की जय संघटनेचे श्री. संजय शिरगावकर म्हणाले, कार्निव्हलला अनेक वर्षांपासून विरोध होत आहे. सध्याच्या काळात तर गोव्यात सांस्कृतिक र्हास झाला आहे. १५-२० वर्षांपूर्वी झाला, त्यापेक्षा आता विरोध अधिक तीव्र व्हायला हवा.
पेडणेसारख्या पावन भूमीत कार्निव्हलचे आयोजन होणे दुर्दैवी ! – जयेश थळी
गोमंतकात संस्कृतीचे एक मोठे केंद्र असलेल्या पेडणेसारख्या पावन भूमीत कार्निव्हलचे आयोजन होणे दुर्दैवी आहे. याचा गोमंतक मंदिर महासंघाचा समन्वयक या नात्याने मी निषेध करतो. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावतो. कार्निव्हलला यापूर्वी विरोध झाला होता; मात्र हळूहळू पोर्तुगीजधार्जिण्या लोकांनी त्यांची पाळेमुळे याठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यातील पोर्तुगीजधार्जिणेपणा पेडण्यात पसरवण्यासाठीच कदाचित या लोकांना कार्निव्हल येथे भरवण्याची दुर्बुद्धी झाली असावी. अनेक मंदिरे असलेल्या पेडणे भूमीत महाशिवरात्रीच्या दिवशी मांस मदिरा यांची रेलचेल असलेला कार्निव्हलसारखा कार्यक्रम करणे हे संतापजनक आहे. यामुळे पेडणेवासियांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पुढील काळात कार्निव्हलच्या विरोधात पेडणेवासीय पेटून उठतील यात शंका नाही.
आज मांद्रे येथे जनजागृती पदयात्रा
मांद्रे येथे आज २१ जानेवारी (रविवार) सकाळी ९ वाजता आस्कावाडा, रवळनाथ मंदिर ते जुनसवाडा, नारोबा देवस्थान अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात