पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांच्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती’ आंदोलनाच्या बैठकीवर बंदी घालण्याची मागणी
कोल्हापूर : पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांच्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती’ आंदोलनाच्या बैठकीवर बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना २० जानेवारीला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, नरेंद्र मोदी विचार मंचचे श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. शरद माळी, बी प्रभाग समितीचे श्री. जयकुमार शिंदे, श्री. किसन कल्याणकर, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुधीर सूर्यवंशी, शानूर गणके, अनिरुद्ध कोल्हापुरे, अनिल कोडोलीकर, रिंकू सोनार, नीलेश सोनार, निखिल माळकर, विवेक मंद्रुपकर, कृष्णा मारवाडे, विशाल पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. ३ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. नास्तिकवादी डॉ. पाटणकर हे जातीपातीचे राजकारण करून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याच्या सिद्धतेला लागल्याचे या बैठकीच्या अनुषंगाने लक्षात येते.
२. १५ डिसेंबर २०१७ या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात त्यांनी जो ‘स्टंट’ केला, तो निश्चितच बारकाईने पडताळण्यासारखा आहे; कारण त्या दिवशी डॉ. पाटणकर यांच्यासमवेत मंदिरात गोंधळ माजवण्याच्या प्रकारामध्ये अनिल म्हमाणे ही व्यक्ती अग्रभागी होती. म्हमाणे याच्यावर ३ जानेवारीला येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपी म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. दंगलीवेळी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील ओटीची दुकाने विस्कटून मंदिर परिसरात दगडफेक करण्यात आली होती.
३. डॉ. पाटणकर ही व्यक्ती कोल्हापूरची रहिवाशी नसून प्रत्येक वेळी येथे येऊन जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करते. ही सर्व मंडळी नास्तिकवादी असून हिंदु धर्माच्या विरोधात विषारी भाषण करून समाजात वितुष्ट निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्या बैठकीत मंदिराविषयी कोणताही चुकीचा निर्णय अथवा धार्मिक भावना दुखावतील, असे विधान झाल्यास आणि त्यांनी आंदोलन छेडले, तर त्यांना ‘जशास तसे’ उत्तर हिंदुत्वनिष्ठ नक्कीच देतील.
४. डॉ. पाटणकर यांच्या आंदोलनाविरुद्ध रस्त्यावर उतरू. त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल, त्याला संपूर्णतः प्रशासन उत्तरदायी राहील.
धार्मिक तेढ निर्माण न होण्यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेईल ! – डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस उपअधीक्षक
बैैठक घेण्यावर कोणावरही बंदी घालता येणार नाही; मात्र त्याठिकाणी कोणतेही धार्मिक तेढ निर्माण करणारे कृत्य होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासन घेईल, तसेच बैठक घेणार्या आयोजकांनाही याविषयी पूर्वसूचना दिली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात