हिंदु राष्ट्रात अशी आर्थिक विषमता नसेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
डाव्होस (स्वित्झर्लंड) : देशातील ७३ टक्के संपत्ती ही १ टक्का भारतियांकडे असल्याची माहिती ऑक्सफेमच्या अहवालाद्वारे समोर आले आहे. हा अहवाल गेल्या वर्षीच्या पाहणीवर आधारित आहे. त्यात गेल्या वर्षीच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या पूर्वसंध्येला हा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यावर परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे.
या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार,
१. गेल्या वर्षीच्या पाहणीनुसार, १ टक्का भारतियांकडे एकूण संपत्तीच्या ५८ टक्के वाटा होता. त्या वेळी जागतिक पातळीवर हे प्रमाण ५० टक्के इतके होते.
२. वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.
३. भारतातील ६७ कोटी नागरिक गरीब असून त्यांच्या संपत्तीत केवळ १ टक्क्याने वाढ झाली आहे.
४. वर्ष २०१७ मध्ये अब्जाधीश लोकांची संख्या प्रत्येक २ दिवसाला १ या वेगाने वाढली आहे. वर्ष २०१० पासून अब्जाधिशांची संपत्ती प्रत्येक वर्षी सरासरी १३ टक्के इतक्या वेगाने वाढली आहे. सामान्य नोकरदाराच्या उत्पन्नवाढीच्या वेगाच्या तुलनेत हा दर ६ पट अधिक आहे. सामान्यांच्या वार्षिक उत्पन्नवाढीचा वेग सरासरी २ टक्के आहे.
५. गेल्या वर्षात जगात निर्माण झालेल्या एकूण संपत्तीचा ८२ टक्के वाटा हा १ टक्का लोकांकडे आहे. ३ अब्ज ७० लाख लोकांच्या (म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या निम्मे) संपत्तीत काहीही वाढ झालेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात