-
पद्मावत चित्रपटाला वाढता विरोध !
-
तीव्र आंदोलन करणार असल्याची चेतावणी
पुणे : पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पद्मावती चित्रपटाचे केवळ नाव पालटले; पण आमच्या भावनांशी खेळ केला जात आहे, असे म्हणत शनिवारवाड्यापासून लाल महालापर्यंत सर्व उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी मोर्चा काढला.
पोलिसांनी या मोर्च्याला अनुमती नाकारल्याने बराच वेळ सर्व हिंदुत्वनिष्ठ शनिवारवाड्याजवळच उभे होते. त्यानंतर करणी सेनेने वैध मार्गानेच मोर्चा काढणार, असे पोलिसांना सांगितले आणि लाल महालापर्यंत घोषणा देत मोर्चा काढला. लाल महालाजवळ पोचल्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी मिळून लाल महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी पद्मावत चित्रपटाच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या. या मोर्च्याला राजपूत करणी सेना (पुणे), बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर करणी सेनेचे ओमसिंह भाटी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाटी म्हणाले की,
१. आम्ही येथे चित्रपटाविरुद्धच्या आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो असतांना आम्हाला अनुमती दिली गेली नाही. आम्हाला आमच्या भावनाही व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे.
२. सर्व चित्रपटगृहांच्या मालकांनी त्यांच्या दायित्वावर हा चित्रपट लावावा. सर्व जनतेने या चित्रपटाला जाण्याचे टाळून चित्रपटाला विरोध करावा, असे आमचे आवाहन आहे.
३. उद्यापासून आम्ही चित्रपटाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाचे संपूर्ण दायित्व प्रशासन, चित्रपट निर्माते आणि चित्रपटाची बाजू घेणारे यांचे असेल.
हिंदुत्वनिष्ठांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि चित्रपटगृहाच्या मालकांनाही याविषयी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच करणी सेनेच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन २५ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी नागरिकांनी चित्रपट पहाण्यास बाहेर पडू नये आणि चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहनही करणी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात