डाव्होस (स्वित्झर्लंड) : आतंकवाद हा धोकादायकच आहे. आतंकवादात चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात ते बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा आरंभ आणि शेवट नमस्ते म्हणून केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,
१. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली. तथापि आज वेगाने पालटत जाणार्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार्या आव्हानांनी अधिक गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.
२. वर्ष १९९७ च्या तुलनेत भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जी.डी.पी.) २ दशकांत आता ६ पटींनी वाढले आहे.
३. सध्या आपण नेटवर्क सोसायटीत नव्हे, तर बिग डेटाच्या विश्वात वावरत आहोत. आज आपल्याकडे डेटा पुष्कळ आहे. डेटाचा पर्वत बनत आहे. त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. म्हणूनच जो या डेटावर नियंत्रण ठेवेल, तोच जगात स्वत:चेे वर्चस्व कायम राखेल, असे म्हटले जात आहे.
४. सध्या जगात सर्वत्र शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा यांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.
५. संपूर्ण जगासमोर वातावरणात होणारे पालट हे एक मोठे आव्हान आहे. बर्फ वितळू लागल्याने अनेक बेटे पाण्याखाली गेली आहेत किंवा जाण्याच्या मार्गावर आहेत.
६. वैयक्तिक सुविधांसाठी कुणाची हानी करणे, हे गांधीजी यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या विरोधात आहे; मात्र आपण स्वत:च्या लाभासाठी आज निसर्गाचा नाश करत आहोत. त्याने आपली प्रगती होईल कि अधोगती, हे आपणच पहायला हवे. भारतीय संस्कृतीत सहस्रावधी वर्षांपूर्वी निसर्गाशी असलेल्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. आपण सर्व मानव धरणीमातेचे पुत्र आहोत, असे त्यात म्हटले आहे.
७. विविधतेने नटलेल्या आमच्या देशातील लोकशाहीवर आम्हांला अभिमान आहे. ही राजकीय व्यवस्था नसून जीवन जगण्याची पद्धत आहे.
८. अनेक राष्ट्रे आज स्वयंकेंद्रीत होत असून हाही पालट आतंकवाद आणि वातावरण यांच्या एवढाच मोठा धोका आहे.
वसुधैव ‘कुटुम्बकम्’मुळेच लोकांमधील अंतर न्यून होईल ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताने नेहमीच वसुधैव कुटुम्बकम् या तत्त्वावर, तसेच एकतेच्या मूल्यावर विश्वास ठेवला आहे, तसेच ते कार्यवाहीतही आणले आहे. वसुधैव कुटुम्बकम्चा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, असा असून त्यामुळेच लोकांमधील अंतर न्यून होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
May be it is for this Mr. Obama came to India!