मुंबई : तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे. महिलांनी स्वत:मध्ये क्षात्रतेज निर्माण करून मुलांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलींवर राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे संस्कार करावेत, जेणेकरून ते हिंदु राष्ट्र घडवण्यास सक्षम होतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. नयना भगत यांनी केले. सांताक्रूझ, वाकोला येथील श्री संकल्प सिद्धी गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माघी गणेश उत्सवानिमित्त विभागातील महिलांसाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. क्रांतीकारकांची शौर्यगाथा दर्शवणारे हिंदु जनजागृती समितीचे फ्लेक्स प्रदर्शन आणि सनातनच्या ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांचे वितरण केंद्र कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आले होते. स्वामी नरेंद्र महाराज संप्रदायातील आणि परिसरातील १२५ महिलांनी या प्रवचनाचा तसेच प्रदर्शनाचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. सनातन प्रभात मधील माहिती वाचून काही जण सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले.
२. प्रवचनाला आलेल्या जिज्ञासूंनी अन्य चार ठिकाणी प्रवचन घेण्याची मागणी केली.
३. सौ. गीता महिंद्रकर आणि सौ. गोसावी यांनी महिलांसाठीच्या धर्मशिक्षणवर्गाची मागणी करून वर्गाचा वार आणि वेळ यांची निश्चिती केली.
४. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा उपस्थित महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात