जमावबंदी आदेश आणि कायदा अन् सुव्यवस्था यांचे कारण सांगितले
ही पोलिसांची मोगलाई नव्हे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सांगली : इतिहासाचे विकृतीकरण करणार्या पद्मावत या चित्रपटाचा निषेध करण्यासाठी आणि या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन (अर्ज) देण्यात आले होते; मात्र जमावबंदी आदेश आणि कायदा अन् सुव्यवस्था यांचे कारण सांगून पोलिसांनी समितीला आंदोलन करण्याची अनुमती नाकारली आहे. तसे समजपत्र पोलिसांनी येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांना दिले आहे. (पद्मावत चित्रपटाच्या विरोधात देशात आंदोलन चालू असून नुकतेच कोल्हापूर येथे २३ जानेवारीला वैध मार्गाने आंदोलन करण्यात आले. असे असतांना समितीच्या वैध मार्गाने केल्या जाणार्या आंदोलनाला विरोध करणे ही पोलिसांची दडपशाहीच आहे. ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होते, त्या ठिकाणी पोलीस काहीच कारवाई करत नाही; मात्र नेहमी वैध मार्गाने आंदोलन करणार्या हिंदु जनजागृती समितीला कायद्याचा धाक दाखवला जातोे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सांगली पोलीस निरीक्षकांच्या स्वाक्षरीने दिलेल्या समजपत्रात म्हटले आहे की, शासन आणि सेन्सॉर बोर्ड यांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनुमती दिली आहे. हिंदु जनजागृती समितीने वैध मार्गाने मागण्या मान्य करून घ्याव्यात. (हिंदु जनजागृती समितीची सर्व आंदोलने, कार्य वैध मार्गानेच असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) समितीने आंदोलन करण्यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आहे. (हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत केलेल्या आंदोलनांपैकी एकाही आंदोलनाने कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. असे असतांना पोलिसांनी अशी माहिती देणे, हा हिंदु जनजागृती समितीला अपकीर्त करण्याचा डाव आहे, असेच हिंदुत्वनिष्ठांना वाटते. कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे ३ जानेवारीला समाजकंटक आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलन करून सांगलीत तोडफोड करण्याविषयीची माहिती पोलिसांच्या गोपनीय विभागाला मिळत नाही; मात्र राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करणार्या समितीची काहीही गोपनीय माहिती नसतांना तशी माहिती पोलिसांना कशी मिळते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यासाठी नाईलाजाने समितीच्या आंदोलनास अनुमती नाकारण्यात येत आहे.
सांगली पोलिसांची दुटप्पी भूमिका !
१६ नोव्हेंबर २०१७ या दिवशी जिल्ह्यात ३७ (१) कलम लागू असतांना क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्मांध संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या फेरीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता. तरीही पोलिसांनी धर्मांधांना अनुमती दिली. याउलट नेहमीच वैध मार्गाने आंदोलन केले जात असतांना आणि कधीच कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नसतांना हिंदु जनजागृती समितीला मात्र अनुमती नाकारण्यात आली, याविषयी हिंदूंमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मिरज येथे राजपूत संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष आणि शिवसेना मिरज शहरप्रमुख विशालसिंह राजपूत यांना गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली असून आंदोलन केल्यास गुन्हे प्रविष्ट करू, असेही म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात