- योगी आदित्यनाथ सरकारच्या राजवटीत अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
- सरकारने लवकरात लवकर या मूर्ती शोधून काढून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बलिया (उत्तरप्रदेश) : येथील एका प्राचीन मंदिरातून अष्टधातूच्या ५ मूर्ती चोरल्याची घटना उघड झाली. या मूर्तींचेे मूल्य तब्बल १५ कोटी रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून चौकशी चालू केली आहे.
बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. जगदेव आनंदजी यांनी या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. या मूर्ती अमूल्य होत्या, तसेच एका मूर्तीचे वजन अनुमाने २० किलो इतके होते, अशी माहिती मंदिराचे पुजारी अरुणकुमार पांडेय यांनी दिली. अरुणकुमार पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते दोन दिवसांपूर्वीच गावाला गेले होते. त्या वेळी चोरांनी मंदिराच्या छतावरून आत शिरून मूर्ती चोरून नेल्या.
नागरिकांचा पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष
सरकारने अशा अकार्यक्षम पोलिसांना सेवामुक्त करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
‘या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशासन कुठलीही माहिती द्यायला सिद्ध नाही. गेल्या काही दिवसांमध्ये चोरीची मोठ-मोठी प्रकरणे घडूनही पोलीस काहीही करतांना दिसत नाहीत’, अशी नागरिकांची तक्रार आहे. गावातील रहिवासी पप्पू राय यांनी ‘पोलीस आणि प्रशासन यांच्या बेफिकीरीमुळेच या मूर्ती चोरीस गेल्या’, असा आरोप केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात