पेडणे येथील प्रस्तावित कार्निव्हलला विरोध
म्हापसा : पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, तसेच त्यांना त्यांच्या हक्काचे स्वतंत्र होमलँड देण्यात यावे. माघ मेळ्यानिमित्त देशातील विविध राज्यांत होणारे हिंदूंचे सण आणि धार्मिक उत्सव यांच्या काळात होणारी रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांतील वाढ त्वरित रहित करावी. या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली २८ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता म्हापसा नगरपालिका बाजार, मुख्यद्वार (गणपतिपूजन करत असलेल्या ठिकाणी) येथे निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; रणरागिणी शाखा; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ; पेडणे, डिचोली, म्हापसा, संभाजीनगर (वास्को) आणि सांखळी येथील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांनी आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा विषय सनातनचेश्री. तुळशीदास गांजेकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. लोकसंख्या संतुलन आणि नियंत्रण हा विषय श्री. गोविंद चोडणकर यांनी मांडला. गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, शिरसई येथील धर्माभिमानी श्री. सत्यवान म्हामल, संभाजीनगर (वास्को) येथील धर्मप्रेमी श्री. हरेश कोरगावकर, म्हापसा येथील धर्माभिमानी श्री. उदय मुंज यांनी पेडणे येथे होऊ घातलेल्या कार्निव्हल मिरवणुकीच्या विरोधात उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनाला गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. चंद्रकांत (भाई) पंडित उपस्थित होते.
श्री. सत्यवान म्हामल म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी पेडणे येथे कार्निव्हलचे आयोजन करणार्या कार्निव्हल समितीचा मी निषेध करतो. श्री. हरेश कोरगावकर म्हणाले, आम्ही सर्व जणांनी १३ फेब्रुवारीला मांद्रे येथे जाऊन कार्निव्हलला विरोध केला पाहिजे. सरकारने खरेतर संस्कृतीरक्षणाचे कार्य केले पाहिजे; मात्र सरकार संस्कृतीवर आघात करणारे कृत्य करत आहे. अशाने आपल्या युवा पिढीवर कुसंस्कार होऊन ती भोगवादाकडे झुकत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात