- मुसलमानबहुल बांगलादेशातील अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात समाजकंटकांनंतर आता सैन्यही आघाडीवर !
- बांगलादेशातील पीडित अल्पसंख्यांक समाजाचा आक्रोश केंद्र सरकारला कधी ऐकू येणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशच्या सैनिकांनी तेथील अल्पसंख्यांक समाजातील मारमा आदिवासी जमातीच्या कुटुंबातील २ अल्पवयीन बहिणींवर घरात घुसून सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितांच्या नातेवाईकांनी रंगमती येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला आहे. पीडित बहिणी बिलाचारी या गावातील रहाणार्या आहेत. त्या अनुक्रमे १७ आणि १४ वर्षे वयाच्या असून त्यांना रंगमती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे.
या बहिणींच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश सैन्याचे ५ ते ६ जवान २२ जानेवारीला सकाळी ३ वाजता कुणा आरोपीला शोधण्याचे निमित्त करून घरात शिरले. त्यांनी बहिणींच्या आई-वडिलांना बांधून ठेवले आणि बहिणींवर अमानुष सामूहिक बलात्कार केला. दुसर्या दिवशी सकाळी बिलाचारी या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना सैन्याच्या फारुआ येथील सैन्यतळावर पाचारण करण्यात आले आणि या घटनेची कोठेही वाच्यता करू नये, अशी चेतावणी देण्यात आली.
काही पत्रकारांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुली आणि त्यांचे नातेवाईक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती आणि त्यांना कुणालाही भेटण्यास मनाई केली. चकमा विभाग प्रमुख देवाशिष राय यांची पत्नी यान यांनी पीडितांची भेट घेतली असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. रंगमती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ब्रिश केतू चकमा यांनी रुग्णालयास भेट दिली आणि वरील बलात्काराची घटना घडल्याचे सांगितले.
बांगलादेश सैन्याचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महंमद राशीदुल हसन यांनी मात्र सैनिकांवरील आरोप फेटाळून लावले असून बहिणींच्या घरातून किंकाळ्या ऐकू आल्याने हे सैनिक घरात गेले असता तेथे स्थानिक सुरक्षादलाचा एक शिपाई आढळला. त्याला सैन्याने अटक केली असून चौकशी चालू आहे असे सांगितले.
या घटनेविरुद्ध रंगमती शहर आणि राजशाही विश्वविद्यालयाच्या समोर अनेक संघटनांनी निदर्शने करून आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनात पर्वतीय चितगाव पहाडी छात्र परिषद, पर्वतीय महिला संघटना आणि गणतांत्रिक जुबो फोरम यांचे कार्यकर्ते तसेच पिडित बहिणींचे नातेवाइक यांनी सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात