बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने असुरक्षित !
ढाका : बांगलादेशच्या जमलपूर जिल्ह्यातील इस्लामपूर उपजिल्ह्यामध्ये पोद्दार पारा येथील श्री काली मंदिरावर धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून विटंबना केली.
धर्मांधांनी रात्रीच्या वेळी मंदिराचे दार तोडून आत प्रवेश केला. श्री कालीमातेच्या मूर्तीची वस्त्रे काढली आणि नंतर मूर्तीचे डोके तोडले. या धर्मांधांनी तेथील शिवमूर्तीचेही डोके धडावेगळे केले आणि तेथून पळ काढला. मंदिराचे पुजारी पहाटे मंदिरात गेले असता तेथील मूर्तींची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेची बांगलादेश मायनॉरिटी वॉच चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना माहिती मिळताच त्यांनी इस्लामपूर पोलीस स्थानकाचे प्रभारी महंमद शाहीनुझ्झमान खान यांच्याशी संपर्क साधला. मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड करणार्या गुन्हेगारांना तातडीने अटक करावी, तसेच हिंदूंच्या मंदिरांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी श्री. घोष यांनी या वेळी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात