दमास्कस (सिरीया) : सिरीयामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आतंकवादविरोधी युती सैन्याने इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) विरोधात केलेल्या कारवाईत सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०१८ पर्यंत म्हणजेच गेल्या ३ वर्षांत १० सहस्रांहून अधिक जण ठार झाले आहेत. यामध्ये ६५५ लहान मुलांसह २ सहस्र ८१५ सामान्य नागरिक आणि ७ सहस्र ३९६ आतंकवाद्यांचा समावेश आहे, असे ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. उत्तर आणि पूर्व सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटचे बलाढ्य नेते ठार झाले असतांनाही सैन्याने सिरीयामध्ये हवाई आक्रमणे चालूच ठेवली आहेत, असे लंडनस्थित मानवाधिकार गटाने म्हटले आहे. देशाचा केवळ ३ टक्के प्रदेशच सध्या इस्लामिक स्टेटच्या नियंत्रणाखाली आहे. सिरीया सरकारने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आतंकवादविरोधी युती सैन्यावर टीका केली आहे. युती सैन्याने आपल्या अनुमतीशिवाय अवैधरित्या हवाई आक्रमणे चालू ठेवल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युती सैन्य विसर्जित (बरखास्त) करण्यात यावे, अशी मागणी सिरीया सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात