चोपडा (जळगाव) : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येथील नगरसेविका सौ. संध्या महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सुसंस्कार काळाची आवश्यकता या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचा २१० महिलांनी लाभ घेतला.
महिलांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी स्वत:पासून प्रारंभ करावा, आपण धर्माचरण केल्याने आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतात, वर्तमानकाळात मातृ देवो भव: अन् पितृ देवो भव: ही संस्कृती लोप पावत आहे. मुले भौतिक गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. लहानपणीच भांडखोर अन् व्यसनाधीन होत आहेत. परिणामी विद्यार्थी शिक्षकांचा अनादर करत आहेत, त्यावर उपाय म्हणून प्रत्येक आईने मुलांकडून धर्माचरण करून घेतल्यास मुले सुसंस्कारीत होतील, असे मार्गदर्शन सौ. जुवेकर यांनी केले. या वेळी त्यांनी महिलांना कपाळावर टिकली लावण्याऐवजी कुंकू लावणे, मुलांनी नियमित कपाळावर टिळा लावणे, महापुरुष, संत यांचे चरित्र वाचणे, वाढदिवस केक कापून साजरा न करता औक्षण करून साजरा करणे यांसारख्या कृती करून धर्माचरण करायला हवे, असे सौ. जुवेकर यांनी सांगितले.
क्षणचित्रे
१. मार्गदर्शनाच्या अखेरीस सर्वांनी विषयाचे महत्त्व पटल्याचे सांगून कपाळावर टिकली न लावता कुंकूच लावणार असल्याचे सांगितले.
२. संयोजक नगरसेविका सौ. संध्या महाजन यांनी देवीपूजनाचे शास्त्र हे लघुग्रंथ वाण म्हणून भेट दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात