नगर : अधर्माचे निर्दालन करण्यास भगवंत अवतीर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिली आहे. स्वधर्म संरक्षण आणि उद्धार करण्यासाठी हिंदु धर्मावर निष्ठा असणारे राज्यकर्ते आवश्यक आहेत. हिंदु धर्मानुसार राज्यकारभार करणारे लोक असावेत, यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया, असे प्रतिपादन दक्षिणेतील प.पू. श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी यांनी केले. राष्ट्रचिंतन आणि विश्वकल्याण दिग्विजय रथयात्रेनिमित्त नगर शहरात त्यांचे आगमन झाले. त्या वेळी जाहीर प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
प.पू. श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की,
१. चतुर्वेद हे सनातन हिंदु धर्माचे चार पाय आहेत. चारही वेदांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने योगदान दिले पाहिजे.
२. भगवंताची भक्ती करण्याचे वेगवेगळे मार्ग असले, तरी भगवंताच्या अनुग्रहाची अनुभूती मिळवणे हे सर्व मार्गांचे एकच ध्येय असते. स्वधर्म परंपरा, गुरुपरंपरा, कुलदेवता आणि धर्मग्रंथ यांवरील श्रद्धा म्हणजेच स्वधर्मनिष्ठा अत्यंत आवश्यक आहे.
३. सूर्यनारायणाने याज्ञवल्क्य ऋषींना स्वतःच्या रथात बसवून घेऊन षडांगासहित चतुर्वेदाचे ज्ञान दिले. त्यातील गूढार्थ, रहस्य सांगितले. पांडवांनी केलेल्या राजसूय यागाचे अध्वर्यु याज्ञवल्क्यच होते. श्रीकृष्णाने त्यांना हे स्थान दिले होते.
४. श्रीकृष्णासोबत याज्ञवल्क्य ऋषींनी संचार केला. या याज्ञवल्क्यांचे प्रथमशिष्य तपोनिष्ठ कण्वऋषी होते. कण्वऋषींची कण्वशाखा प्रथमशाखा म्हणून सर्वपरिचित झाली. महात्मा बसवेश्वर हे कण्वशाखेचेच होते. त्यांनी बाराव्या शतकात धर्मरक्षणासाठी अद्वितीय कार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात