पुणे : हिंदूसंघटन, धर्मजागृती, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्देशाने चंद्रभागानगर येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या मैदानावर ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंना जागृत करून त्यांना धर्मशिक्षणाचे धडे देणे, जात-पात-पक्ष-संप्रदाय यांचा अभिनिवेष बाजूला सारून धर्माच्या आधारावर हिंदूंचे संघटन करणे, त्यांच्यामध्ये धर्मजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशानेच धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंच्या ऐक्यासाठी हिंदूंनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. सभेची माहिती देण्यासाठी समितीच्या वतीने येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या परिषदेत सनातन संस्थेचे प्रवीण नाईक, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोहनराव डोंगरे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. मुकुंद मासाळ उपस्थित होते.
‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या प्रेरणेने लाखो धारकरी हिंदु राष्ट्राच्या प्रेरणेने कार्य करत आहेत. आम्ही सर्व धारकरी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहाणार आहोत’, श्री. मुकुंद मासाळ यांनी सांगितले.
‘आम्ही हिंदुत्वाविषयीचा संकल्प (बजेट) मांडण्यासाठी आलो आहोत. पुण्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांंची बैठक घेऊन त्यांनाही मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येणार आहे’, असे अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात