Menu Close

४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – डॉ. अंजेश कणगलेकर

बेळगाव येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष

वाहनफेरीत सहभागी धर्मप्रेमी

बेळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी येथील आदर्श कॉलेजच्या मैदानात ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन केले आहे. या सभेसाठी समस्त धर्माभिमानी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. अंजेश कणगलेकर यांनी केले. या सभेच्या निमित्ताने १ फेब्रुवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या फेरीत ५५ हून अधिक दुचाकी आणि १२५ अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

समितीच्या कार्यकर्त्यांनी कपिलेश्‍वर देवस्थानात जाऊन फेरी आणि सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी शिवाचे आशीर्वाद घेतले. कपिलेश्‍वर मंदिराचे पुजारी श्री. कपिलनाथ पुजारी यांनी शंखनाद केला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. विश्‍वनाथ पाटील यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करण्यात आले. पौरोहित्य पुरोहित श्री. धनंजय वडेर यांनी केले. वाहतुकीस अडथळा न आणता अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदुत्वाचे स्फुल्लिगं चेतवणार्‍या फेरीने बेळगावकरांचे मन जिंकले.

फेरीत सहभागी मान्यवर आणि संघटना : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. कृष्णा प्रधान, प्रवीण चतुर, बजरंग दलाचे सर्वश्री राजू भातखंडे, संतोष कडोलकर, निलेश जाधव, अनुप पवार, नरेश शिंदे, भाजपचे श्री अनिल कुरणकर आणि श्री. प्रवीण पिळणकर, अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. मिलन पवार, दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. विनायक नाकाडी आणि श्री. विजय मेलगे, धर्मप्रेमी श्री. नारायण कावळे, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वक श्री. गुरुप्रसाद गौडा

क्षणचित्रे

१. श्री. विश्‍वनाथ पाटील यांनी फेरी चालू होण्याच्या पूर्वी धर्मध्वजास डोके टेकवून नमस्कार केला, तर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेनेही डोके टेकवून धर्मध्वजास नमस्कार केला.

२. अनेक ठिकाणी नागरिक, व्यापारी, धर्मप्रेमी थांबून फेरी पहात होते. काहींनी फेरीची छायाचित्रे काढली, तर काहींनी फेरीचे चित्रीकरण केले. काही ठिकाणी धर्मप्रेमींनी फेरी पाहून उत्स्फूर्तपणे ‘जय भवानी जय शिवाजी’ यांसह अन्य घोषणा दिल्या.

३. इन बेलगाम न्यूज आणि सिटी केबल न्यूज या स्थानिक वाहिन्यांनी फेरीचे चित्रीकरण केले आणि वृत्त संकलन केले.

४. फेरीत कु. क्षिप्रा सुतार (वय ३ वर्षे), कु. आराध्या गुंजेकर (वय ४ वर्षे) आणि कु. मिथाली पवार (१० वर्षे) या बालसाधिकाही सहभागी झाल्या होत्या.

५. या फेरीचे फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

विशेष

वाहनफेरीची अनुमती विविध अडचणींमुळे ३१ जानेवारीला रात्री ८.४० वाजता मिळाली. यानंतर अत्यंत अल्प वेळ असतांनाही समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मप्रेमींना निरोप दिल्यानंतर त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने फेरीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *