बेळगाव : हिंदु धर्म हा सात्त्विक असून सर्वसमावेशक आहे. सध्या हिंदुत्वाला नवी झळाळी येत असून हिंदु धर्म कसा आहे, हे अनुभवण्यासाठी प्रत्येकाने ४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या हिंदु धर्मजागृती सभेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रखर राष्ट्राभिमानी अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी यांनी केले. बेळगाव येथे ४ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ज्योती दाभोलकर, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे डॉ. अंजेश कणगलेकर उपस्थित होते.
अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी पुढे म्हणाले की, मधल्या काही काळात क्षात्रतेज अल्प झाल्याने हिंदु धर्मावर विविध संकटे वाढली; मात्र आता परिस्थिती पालटत आहे. हिंदु धर्म-हिंदु राष्ट्रात तुष्टीकरणाला नाही, तर क्षमतेला महत्त्व दिले जाईल. सैन्याचेच उदाहरण द्यायचे झाले, तर सैन्यातही क्षमतेलाच प्राधान्य दिले जाते. उदात्त, सांस्कृतिक हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्रित येणे अत्यावश्यक आहे आणि तेच धर्मजागृती सभेच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
विशेष
पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध दैनिक, वृत्तवाहिन्या यांचे एकूण १८ पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्राविषयी पत्रकाराचे केलेले शंकानिरसन !
एका पत्रकाराने सध्याच्या राजकीय परिस्थितीत हिंदु राष्ट्र कसे येईल, असा प्रश्न विचारला. त्यावर श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले, वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे, असे संतांनी सांगितले आहे. आता सगळीकडे हिंदु राष्ट्रासाठी पोषक वातावरण आहे. हिंदु राष्ट्र या विषयाची चर्चा केवळ जिल्हास्तरीय राहिली नसून ती भारतभर होत आहे. सगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ध्येयही हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे या सर्वांचे सार पहाता वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र निश्चितपणे येईलच !
या वेळी बोलतांना अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी म्हणाले, मी प्रारंभीच्या काळात सैन्यात राहून देशाची सेवा केली. नंतर ५० वर्षे वकिली केली आणि सध्या हिंदुत्वाच्या कार्याशी निगडीत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात