शांततामय मार्गाने होणार्या आंदोलनांना अनुमती नाकारण्याची मर्दुमकी केवळ हिंदूंसमोरच का दाखवली जाते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही वेळेपूर्वीच पोलिसांनी या आंदोलनास अनुमती नाकारली. त्यामुळे हे आंदोलन रहित करण्यात आले. या आंदोलनाला उपस्थित रहाणारे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, धर्मप्रेमी हिंदू आदींची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘फेसबूक पेज’वरून सर्व हिंदुत्वनिष्ठांना हे आंदोलन रहित झाल्याचे कळवण्यात आले. याशिवाय आंदोलनस्थळीही काही वेळासाठी सदर आंदोलन रहित झाल्याविषयीचे फलक घेऊन थांबावे लागले. या वेळी ध्वनीक्षेपकयंत्रणा लावण्यात आली नाही, तसेच कोणत्याही घोषणाही देण्यात आल्या नाहीत.
या वेळी ‘फेसबूक पेज’वरून या आंदोलनाचा विषय, तसेच मागण्या यांविषयीची माहितीही देण्यात आली. मागण्यांमध्ये ‘देशाची अखंडता टिकून रहाण्यासाठी सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी प्रवासभाड्यात करण्यात येणारी दरवाढ रहित करावी, विस्थापित काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये स्वतंत्र जागा देऊन तेथे त्यांचे त्वरित पुनर्वसन करावे, बिहार सरकारकडून केवळ अल्पसंख्य समाजातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची योजना रहित करून त्याजागी सर्व समाजासाठी तशी समान योजना सिद्ध करावी’, अशा काही मागण्यांचा समावेश होता. ‘फेसबूक’द्वारे पोहोचवलेल्या या विषयाचा २ सहस्रांहून अधिक लोकांनी लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात