विकराबाद (आंध्रप्रदेश) येथे हिंदु धर्मजागृती सभा
विकराबाद (तेलंगण) – तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिंदूंनी स्वत:ला दूर ठेवावे, असे प्रतिपादन येथील ‘हिंदु जनशक्ती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित कुमार यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विकराबाद शहारातील सत्यभारती सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी अधिवक्ता माधव रेड्डी, ‘दुर्गा वाहिनी’च्या जिल्हाप्रमुख श्रीलता रेड्डी आणि हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांचे समन्वयक श्री. चेतन जनार्दन उपस्थित होते.
श्री. ललित कुमार पुढे म्हणाले, ‘‘आज आपण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करतो; परंतु पाश्चात्त्य राष्ट्रे विशेषतः अमेरिका संस्कृतीहीनतेवर निर्माण झाली आहे. हिंदू जेव्हा भारतात हिंदुत्वाचा प्रचार करतात, तेव्हा ‘कम्युनिस्ट’ आणि निधर्मी विचारधारा त्यांना कडाडून विरोध करतात. ही मंडळी ‘भारतातील लोकशाही धोक्यात आहे’, ‘भारताचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड करतात. तथापि भारत अनादि काळापासून हिंदुत्वनिष्ठच आहे. मग या भूमीत हिंदुत्वाचा प्रचार करण्यात चुकीचे काय आहे ? आजकालचे माता-पिता ‘आमचा मुलगा किंवा मुलगी याला अन्य पंथीय मित्र किंवा मैत्रिणी आहेत’, असे मोठ्या आविर्भावात सांगतात. हिंदूंनी असल्या निधर्मी विचारधारेपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे आणि हिंदु धर्माची महानता जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’
हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला स्वत:चे जीवनध्येय मानावे ! – चेतन जनार्दन
हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘आज हिंदूंसमोर अनेक प्रश्न आ-वासून उभे आहेत. यावर ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हेच एकमेव उत्तर आहे. हिंदू केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र स्थापन करतील. कासगंज (उत्तरप्रदेश) येथे ‘भारतमाता की जय’, असे म्हणणार्यांना ठार मारण्यात आले. किती हिंदूंनी याविरोधात आवाज उठवला ? हिंदूंमध्ये एकमेकांना साहाय्य करण्याची धर्मभावना जागृत झाली नाही, तर उद्या एकही हिंदू ‘हिंदु’ म्हणून जगू शकणार नाही. यास्तव हिंदूसंघटन आवश्यक असून हिंदु जनजागृती समितीने २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांना हिंदुत्वाच्या एकाच व्यासपिठावर आणले आहे. प्रत्येक हिंदूने स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला स्वत:चे जीवनध्येय मानून कार्यरत राहिले पाहिजे.’’
अधिवक्ता माधव रेड्डी यांनी उपस्थितांना हिंदु धर्म नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत असल्याविषयीची माहिती दिली. श्रीलता रेड्डी यांनी ‘हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात स्त्रीची भूमिका फार मोठी आहे. प्रत्येक स्त्रीने स्वत: धर्माचरण करावे आणि मुलांकडूनही ते करून घ्यावे’, असे सांगितले. या हिंदु धर्मजागृती सभेचे प्रास्ताविक श्री. नेला तुकाराम यांनी केले. या सभेस ४०० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
अल्प संख्या असूनही तळमळीने सेवा करून हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करणारे साधक, कार्यकर्ते आणि धर्माभिमानी हिंदू यांचे अभिनंदन !
आंध्रप्रदेशात समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांची संख्या अल्प असूनही या सर्वांनी धर्माभिमानी हिंदूंच्या साहाय्याने हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. त्यामुळे सभेला हिंदूंचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी सर्व कार्यकर्ते, साधक आणि धर्माभिमानी हिंदू यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्वत्रचे कार्यकर्ते, साधक आणि धर्माभिमानी हिंदू यांनी हा आदर्श घ्यावा.’
केवळ २ कार्यकर्त्यांमुळे सभा यशस्वी !
१. या सभेसाठी केवळ श्री. चेतन जर्नादन आणि श्री. नेला तुकाराम या दोघांनी विकराबाद येथे ५ दिवस प्रसार केला. केवळ दोघांनी प्रसार करूनही हिंदु धर्मजागृती सभेस ४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. ‘केवळ गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले’, असा या दोघांचा भाव होता.
२. सभेनंतरच्या आढावा बैठकीत ९० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
३. आढावा बैठकीस उपस्थित धर्मप्रेमींनी आणखी ४ ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली