प्रयाग येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे राष्ट्र-धर्म जागृती संमेलनाचे आयोजन
प्रयाग : सध्याच्या धर्मविहीन (सेक्युलर) व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकांच्या जीवनातून धर्म विलुप्त झाला आहे. त्यामुळे सकाळी दुध देणार्यापासून डॉक्टरपर्यंत सर्व जण समाजाला लुटतात. प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर पोलीस अन् न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत. प्रत्येक जण परपीडा देण्याचे पापमय आचरण करतो. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार, अनैतिकता आदी वाढले आहे. धर्माला ग्लानी आल्यासारख्या विद्यमान परिस्थिती आहे. धर्माला ग्लानी आलेली असली, तरी अवतार, संत, महापुरुष आदींकडून धर्माची पुनर्स्थापना होते, ही हिंदु धर्माची विशेषता आहे. आजच्या काळातही धर्मसंस्थापनेसाठीची साधना म्हणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीद्वारे आयोजित राष्ट्र-धर्म जागृती संमेलनात ते बोलत होते.
या वेळी साधनेच्या प्रत्यक्ष कृती या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाल म्हणाले की, हिंदु धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता मोक्षप्राप्तीतच आहे. मोक्षप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न म्हणजे साधना होय. नामजप ही कलियुगात सर्वांत सुलभ अशी साधना आहे. नामजपातून मिळणारा आनंद सत्संगात आल्यानंतर वाढतो. यासाठी नियमित सत्संगात रहा. आपल्या भागात सत्संग देणारा धर्मशिक्षणवर्ग आयोजित करा ! धर्मशिक्षणवर्ग आयोजित करणे, ही धर्मप्रसाराची सेवा आहे.
या वेळी प्रयाग येथे धर्मजागृतीचे कुठले उपक्रम राबवले जाऊ शकतात, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुळकर्णी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ ४५ जणांनी घेतला. या कार्यक्रमात साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याचे निश्चित झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात