सभेची अनुमती रहित करण्याची निवेदनाद्वारे मागणी
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना सभाही घेऊ न देणे, ही लोकशाही आहे का ? त्यामुळे हिंदूंच्या संविधानिक अधिकारांचे हनन होत नाही का ? कधी नव्हे एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्या हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा उधळून लावण्याची धमकी देणे म्हणजे देशात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अमरावती : येथे ११ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली आहे. ‘या सभेमुळे जातीय दंगली होतील. त्यामुळे सभेची अनुमती रहित करून हिंदु जनजागृती समितीवर बंदी घालावी’, असा कांगावा करत भीम आर्मीने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. सभेला अनुमती दिल्यास सभा उधळून लावण्याची धमकीही निवेदनात दिली आहे. या निवेदनावर भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष साठे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
‘भीम आर्मी – भारत एकता मिशन’ या संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातील काही सूत्रे
१. अमरावती येथे ११ फेब्रुवारीला संत गाडगे महाराज यांच्या समाधीसमोरील मैदानात हिंदु धर्म जनजागृती समितीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. (समितीचे नावही नीट लिहू न शकणारे संघटनेच्या कार्यक्रमात काय असेल, याचा अंदाज बांधून निवेदन देतात, याला काय म्हणावे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कार्यक्रमामध्ये त्यांनी हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे ठरवले आहे.
२. या कार्यक्रमामुळे जातीजातींमध्ये द्वेष निर्माण होईल. त्यामुळे शहरातील वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. यामध्ये सर्व जातीधर्माचे, वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे लोक एकोप्याने रहातात आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १ नुसार या देशाला ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ असे म्हटलेले आहे.
३. या कार्यक्रमामुळे अमरावती शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे (हिंदु धर्मजागृती सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची एकही घटना आतापर्यंत घडलेली नाही. असे असतांना निवेदनातून धादांत खोटे आरोप करणे म्हणजे हिंदु जनजागृती समितीची अपकीर्ती करणेच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात); म्हणून हिंदु धर्म जनजागृती या संघटनेवर अमरावती जिल्ह्यात बंदी घालून या कार्यक्रमाला अनुमती नाकारावी. जर पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाला अनुमती दिली, तर भीम आर्मी संघटना हा कार्यक्रम उधळून लावेल. याचे सर्वस्वी दायित्व पोलीस प्रशासनाचे राहील. (अशी उघड धमकी देणे, हे लोकशाहीच्या कोणत्या तत्त्वात बसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अमरावती येथील हिंदु धर्मजागृती सभेला होणारा विरोध अपसमजातून आणि अभ्यासहीन ! – हिंदु जनजागृती समिती
अमरावती येथे होणारी हिंदु धर्मजागृती सभा ही ना कोणत्या जातीच्या, ना कोणत्या समाजाच्या विरोधात आहे. ही सभा हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी, हिंदूंचे संघटन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे. यामुळे अमरावती येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला काही संघटनांनी केलेला विरोध हा अपसमजातून आहे आणि अभ्यासहीन आहे. ही सभा ‘सर्वच जातींच्या मुलींची काही धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक, हिंदु धर्मातील विविध जातींमधील लोकांचे फसवून आणि बळजोरीने केले जाणारे धर्मांतर, जिहादी आतंकवाद या आघातांच्या विरोधात आवाज उठवणे, त्याचसमवेत हिंदूंचे संघटन करणे’ यांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे वैध आणि कायदेशीर मार्गाने होणार्या सभा उधळून लावण्याची धमकी देणे हे वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. अशा धमक्यांना न जुमानता अमरावती येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय या सर्वांच्याच सहकार्याने आणि सहभागाने ही सभा होणारच आहे. तरी समस्त हिंदु बांधवांना आवाहन आहे की, आपण सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात