पेडणे : येथील धर्माभिमानी हिंदूंनी तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर हरमल, पेडणे येथे विदेशी नागरिक साजरा करत असलेल्या कार्निव्हलमध्ये हिंदूंच्या देवतांच्या होणार्या विडंबनाला यंदा आळा बसला आहे. (पेडणे येथील धर्माभिमानी हिंदूंची अभिनंदनीय कृती ! हे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. इतर ठिकाणच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा. हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हरमल, पेडणे येथे मागील तीन वर्षांपासून विदेशी नागरिक कार्निव्हल साजरा करत आहेत. यामध्ये विदेशी नागरिक हिंदूंच्या देवता श्री गणपति, श्री दुर्गादेवी आदी देवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करून कार्निव्हलमध्ये सहभागी होत असत. (हिंदूंच्या निष्क्रीयतेमुळेच कोणीही उठतो आणि हिंदु देवतांचे विडंबन करतो. इतर धर्मीय जागरूक असल्याने कोणीही त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडसही करू शकत नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हरमल, पेडणे येथे ८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. पेडणे येथील धर्माभिमानी हिंदूंना ही गोष्ट ८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना कार्निव्हलमधील हिंदूंच्या देवतांचे विडंबन रोखण्याची मागणी करणारे एक निवेदन सुपुर्द केले. या निवेदनात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उपजिल्हाधिकार्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि देवतांचे विडंबन केले जात असल्याविषयी नाराजी व्यक्त केली. यानंतर हरमल येथे विदेशींचा कार्निव्हल झाला. त्यात देवतांचे विडंबन केले गेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात