नवी देहली : मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने जोरदार आक्षेप घेत ‘मालदीवमध्ये अन्य कुठल्याही देशाच्या हस्तक्षेपाला आमचा ठाम विरोध असून तेथे कोणतीही कारवाई केल्यास परिस्थिती अधिक चिघळू शकते’, अशी धमकी भारताला दिली आहे.
१. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने ‘भारताने काहीतरी ठोस भूमिका घ्यावी’, अशी मागणी करत आहेत. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते महमंद नाशीद यांनी ‘भारताने सैनिकी हस्तक्षेप करावा’, अशी मागणी केली आहे.
२. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ‘राष्ट्राध्यक्ष यामीन चीनच्या प्रभावाखाली काम करत आहेत’, असा आरोप केला, तसेच परिस्थिती चिघळलेली असतांना भारताने अद्यापपर्यंत दूतही न पाठवणे दुर्दैवी असल्याचेही म्हटले आहे. मालदीवमधील विरोधी पक्ष भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांच्या संपर्कात आहेत.
३. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी १५ दिवसांची आणीबाणी घोषित केल्यानंतर मालदीवचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २ न्यायमूर्तींना अटक केली आहे. आणीबाणीमुळे कोणालाही अटक करणे, धाड घालणे आणि संपत्ती शासनाधीन (जप्त) करण्याचे अधिकार तेथील सरकारला मिळाले आहेत.
मालदीवची अन्य राष्ट्रांना साहाय्याची हाक !
भारताकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रपती यामीन यांनी चीन, पाकिस्तान आणि सौदी अरब या देशांमध्ये साहाय्यासाठी राजदूत पाठवले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात