अमरावती : येथे ११ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ अशा एकूण ३२ जणांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. या वेळी समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. याविषयीचा वृत्तांत पुढे दिला आहे.
हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांसाठी सदैव पाठीशी राहू ! – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचा निर्धार
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना श्री. सुनील घनवट यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, त्या कार्यातील अधिवक्त्यांचा सहभाग यांविषयी मार्गदर्शन केले. न्यायालयीन पद्धतीने सामाजिक दुष्प्रवृत्ती थांबवणे, माहितीचा अधिकाराचा वापर करणे, लव्ह जिहाद यांवरही चर्चा करण्यात आली. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या यशस्वी कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. त्यानंतर अधिवक्त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांसाठी सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत. न्यायालयीन लढा, माहितीचा अधिकार अशा विविध माध्यमांतून आम्ही विनामूल्य सहकार्य करू. आम्ही सर्वजण सनातन प्रभातचे वाचक होऊ.’’
या वेळी बार काऊन्सिलचे सचिव अधिवक्ता श्री. प्रतिक पाटील, सर्व अधिवक्ते आशिष लांडे, राजेश भोपत, राजेंद्र गवळी, नितेश झंझळकर, मनोज कश्यप, कपिल गुप्ता, आनंद ठाकरे, राजेश भोपत, राहुल बानुबाकोडे, चैतन्य गावंडे, उमेश बानुबाकोडे, राजेंद्र गवळी, नितेश झंझळकर यांसह १५ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते बैठकीला उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांना नेहमीच पाठिंबा असेल ! – प्रवीण पोटे-पाटील, पालकमंत्री, अमरावती शहर, भाजप आमदार आणि राज्य पर्यावरण मंत्री
श्री. सुनील घनवट यांनी पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीमध्ये समितीच्या कार्याची माहिती आणि धर्मजागृती सभेचे निमंत्रणही दिले. श्री. पोटे-पाटील म्हणाले की, मी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहीन. माझा हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांना नेहमीच पाठिंबा असेल. सनातन संस्थेचे ग्रंथ वाचनालयात असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन.’’
लव्ह जिहाद आणि धर्मावरील आघातांच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीचे कार्य उल्लेखनीय ! – खासदार आनंदराव अडसूळ
समितीचे लव्ह जिहाद आणि धर्मावरील आघातांना विरोध करणे या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी केव्हाही हाक दिल्यास मी सदैव उपस्थित राहीन, असे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. श्री. घनवट यांनी श्री. अडसूळ यांना हिंदूसंघटनाच्या कार्याची माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्री. ज्ञानेश्वर धाने पाटील, तसेच शिवसेना महिला आघाडी, अकोला आणि अमरावती संपर्क प्रमुख सौ. माधुरी देसाई आणि महिला आघाडीच्या सर्व सदस्या, तसेच शिवसेनेच्या नगरसेविका उपस्थित होत्या.
सर्वांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करून ११ फेब्रुवारीला होणार्या धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला निश्चितच उपस्थित रहाणार ! – तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती, तसेच भाजप नगरसेवक
येथील स्थायी समिती सभापती, तसेच भाजप नगरसेवक श्री. तुषार भारतीय यांच्यासमवेत आयोजित केलेल्या बैठकीत हिंदूसंघटनाविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी भारतीय म्हणाले, ‘‘हिंदूसंघटन आणि धर्मजागृती सभा यांच्या माध्यमातून होणारी जागृती अतिशय स्तुत्य आहे.’’ अमरावती येथील गणेशोत्सव आणि गणेशविसर्जन यांविषयी उपाययोजना काढण्याविषयी चर्चा केल्यावर श्री. भारतीय यांनी ‘सभेनंतर याविषयी बैठकीचे आयोजन करूया’, असे आश्वासन दिले.
या वेळी शिक्षण सभापती श्री. चेतन गावंडे यांनीही समितीचे राष्ट्ररक्षणाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी समितीचे क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन कायमस्वरूपी घेऊन महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लावण्याचे आश्वासन दिले.
लोकशाहीतील दृष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढ्यात योगदान राहील ! – श्री अनिल अग्रवाल, मालक आणि संपादक, दैनिक मातृभूमी अन् सायं दैनिक मंडल
समितीच्या सुराज्य अभियानात सहभागी होणे, त्याला प्रसिद्धी देणे, माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवून देणे यांसाठी मी माझे योगदान देईन, असे दैनिक मातृभूमी अन् सायं दैनिक मंडल यांचे मालक आणि संपादक श्री. अनिल अग्रवाल यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार रोखणे आणि लव्ह जिहादपासून त्यांचे रक्षण करणे यांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
राष्ट्र आणि धर्महानी रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् राजपूत संघटना एकत्रितपणे कार्य करणार ! – राजेंद्रसिंह ईश्वरसिंह राजपूत, वरिष्ठ महामंत्री, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा
राजपूत संघटना नेहमीच राष्ट्र आणि धर्महानी रोखण्यासाठी कार्य करते. हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतल्यावर यापुढे राष्ट्र्र आणि धर्महानी रोखण्यासाठी समिती आणि राजपूत संघटना नेहमी संयुक्त विद्यमाने कार्य करेल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही समितीच्या कार्यासमवेत जोडून देऊ’, असे श्री. राजपूत यांनी व्यक्त केले. श्री राजपूत हे राजपूत फोरमचे महासचिव, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती प्रदेश अध्यक्ष, तसेच दुर्गामाता मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची संकल्पना उत्तम ! – श्री. नरेंद्र भाराणी, उद्योगपती
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची संकल्पना अतिशय उत्तम आहे. त्यासाठी माझे नेहमी योगदान असेल’, असे येथील प्रतिष्ठित उद्योगपती श्री. नरेंद्र भाराणी यांनी सांगितले. या वेळी त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ही पुस्तिका भेट देण्यात आली. सर्वांनाच ईश्वरी कार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री. भाराणी म्हणाले.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदु जनजागृती समितीची घौडदौड कौतुकास्पद – जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष, अमरावती शहर-जिल्हा भाजप
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य उल्लेखनीय अन् कौतुकास्पद आहे. धर्मजागृती सभा आणि अन्य उपक्रम यांंमुळे हिंदु समाज संघटित होत आहे. ही हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदीच आहे. समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यात मी नेहमीच सक्रीयपणे सहभागी राहीन’, असे आश्वासन भाजपचे जिल्हाध्यक्ष जयंत डेहनकर यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात