Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी भगवंताला प्रार्थना करा ! – पारस राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट

पंचम मुंबई-ठाणे-रायगड प्रांतीय हिंदु अधिवेशन २०१८

हिंदूंनी मोदी यांना निवडून देऊनही त्यांनी अद्याप हिंदूंची एकही आकांक्षा पूर्ण केलेली नाही. पंतप्रधान असतांना त्यांनी ‘पहिले शौचालय, नंतर देवालय’, अशी घोषणा केली. ‘पहिले शौचालय, फिर चर्च, फिर मशीद’, असे आवाहन का केले नाही ? आम्ही तुम्हाला झाडू घेऊन स्वच्छता करण्यासाठी निवडून दिले नाही. देशाचा खरा कचरा जिहाद आहे. त्याला कधी स्वच्छ करणार ? हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये आतंकवाद ही मोठी समस्या आहे. हा वेळ आपण वाया घालवला, तर येणार्‍या काळात आपल्याकडे केवळ माती शिल्लक राहील. यावर एकमात्र उपाय आहे, आपण माळेचा जप करतो, मात्र भाल्याची पूजा केली नाही, तर धर्माची रक्षा करता येणार नाही. ‘कॅशलेस’ने आतंकवाद संपवता आला असता, तर फ्रान्समध्ये आतंकवादी राहिला नसता. प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे निश्‍चित आहे. जेव्हा आपण ईश्‍वरासाठी प्रार्थना करू, तेव्हा हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करा !

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना त्यांचा तेजस्वी इतिहास शिकवायला हवा ! – सर्वेश चौरासिया, युवा हितकारिणी संघ, ठाणे

आजही ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आमिष दाखवून आदिवासी भागांत मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येते. धर्माचे महत्त्व आदिवासींपर्यंत न पोचल्याने त्यांचे धर्मांतर होत आहे. आदिवासी भागातील हिंदूंमध्ये धर्माविषयी आस्था आहे; मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोचायला आपण न्यून पडत आहोत. हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. याची माहिती हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धर्माचे महत्त्व सर्व हिंदु बांधवांपर्यंत पोचवायला हवे. पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आपल्या धर्मग्रंथामध्ये आधीच प्रमाणित करण्यात आले आहेत. हिंदूंचा हा तेजस्वी इतिहास पाठ्यपुस्तकातून मुलांपुढे ठेवायला हवा.

समाजातील भ्रष्टाचारादी दुष्प्रवृत्तींना नष्ट करणे, हा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अविभाज्य भाग ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

भ्रष्टाचार ही सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेतील एक माध्यम म्हणून ही दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक विषयावर कार्य न करता केवळ हिंदुत्वासंबंधी विषयावर कार्य करत असल्याने सर्वसामान्यांचे आपल्याला साहाय्य मिळत नाही. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक विषय हाताळले पाहिजेत; मात्र आपले ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना असले पाहिजे. भ्रष्टाचार्‍यांच्या मनात हिंदुत्वनिष्ठांच्या प्रामाणिकपणाचे भय निर्माण होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व कम्युनिस्ट आणि पुरोगामी यांच्याकडे आहे. नागरिकांच्या हितासाठी हे नेतृत्व प्रामाणिक हिंदुत्वनिष्ठांकडे असायला हवे. भ्रष्टाचाराविरोधात कृती करणे आरंभी कठीण असले, तरी भगवंताला शरण जाऊनच लढा द्यावयाचा आहे.

धर्माचरण हेच पाश्‍चात्त्यांच्या कुप्रथेला प्रत्युत्तर ! – रूपेश शर्मा, चिन्मय मिशन

 

मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे ब्रिटिशांनी भारतियांना मानसिक गुलाम केले. आजची पिढी इंग्रजांचे अंधानुकरण करत आहे. आज हिंदूच मोठ्या प्रमाणात ख्रिस्मस साजरा करतात. धर्माचरण हेच पाश्‍चात्यांच्या कुप्रथेला प्रत्युत्तर आहे.

नेतृत्व आणि संघटनकौशल्य याला साधनेची जोड देणे आवश्यक ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपणाला आसेतुहिमालय हिंदूंचे संघटन करावयाचे आहे. अधिवेशनातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीप्रवण व्हायचे आहे. धर्मकार्यासाठी भगवंताने आपली निवड केली, ही सौभाग्याची गोष्ट आहे. हिंदु राष्ट्र घडवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व निर्माण व्हायला हवे. नेतृत्व आणि संघटना यांना साधनेची जोड देणे आवश्यक आहे. साधना करणाराच भावनाविरहित नेतृत्व करू शकतो. आपण किती समर्पित भावनेने या कार्यात सहभागी होत आहोत, ते भगवंत पहात आहे. यातून आपली शुद्धी होणार आहे.

येणार्‍या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी साधना वाढवा ! – सागर चोपदार, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म, हिंदु बांधव यांच्यावरील आघात वाढतच आहेत; मात्र हिंदूंचे संघटनही वाढत आहे. भारताचे जेव्हा शत्रूराष्ट्राच्या विरोधात युद्ध होईल, तेव्हा युद्धकाळात भारताची युद्धनीती काय असेल, याविषयी राज्यकर्त्यांनी देशवासियांना अवगत केले आहे का ? येणार्‍या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आतापासूनच आपण प्रथमोपचार, अग्निशमन प्रशिक्षण, अग्निहोत्र, औषधी वनस्पतींची लागवड आदी उपायही समजून घेणे आणि करणे आवश्यक आहे. या सर्वांना साधनेची जोड दिली, तरच येणार्‍या भीषण आपत्काळाला आपण तोंड देऊ शकतो.

प्रसिद्धीमाध्यमांपुढे धर्माचे कार्य निरपेक्षपणे ठेवायला हवे ! – शंभू गवारे, प्रवक्ता, सनातन संस्था

आपण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समर्पित भावाने कार्य केल्यास ते प्रसारमाध्यमांच्या लक्षात येते. त्यामुळे त्यांचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. प्रसिद्धीमाध्यमांपुढे आपण निरपेक्षपणे धर्माचे कार्य ठेवायला हवे. वृत्तवाहिनीवर चर्चासत्रात सहभागी होतांना आपले म्हणणे आत्मविश्‍वासाने मांडायला हवे.

प्रभावीपणे धर्मकार्य होण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. नंदिनी सुर्वे, रणरागिणी शाखा

हिंदु राष्ट्र स्थापनचे कार्य शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक स्तरावर प्रत्येकी १० टक्के होणार असून आध्यात्मिक स्तरावर ७० टक्के असणार आहे. आध्यात्मिक स्तरावरील कार्याला सर्वाधिक महत्त्व असल्याने हिंदूने धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे. साधना करून अनुभूती आल्यावर धर्मावरील श्रद्धा दृढ होऊन धर्मकार्य प्रभावीपणे करता येते. रामराज्यात प्रजा धर्माचरण करणारी होती. त्यामुळे आदर्श राज्य म्हणून आजही रामराज्याचे उदाहरण दिले जाते. अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळांतून धर्मशिक्षण दिले जाते. हिंदूंसाठी मात्र तशी व्यवस्था नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *