मुंबई : १४ फेब्रुवारीला असणार्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सर्वत्र अपप्रकार होतात. त्यांना विरोध करणे, युवा पिढीचे प्रबोधन करणे आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे याविषयीची निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिली जातात. या संदर्भातील वृत्तांत पुढे देत आहोत.
जळगाव
व्हॅलेंटाईन डेनिमित्त शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके आणि उच्च शिक्षण संचालक श्री. केशव तुपे यांना देण्यात आले. येथील ८ महाविद्यालयांतील प्राचार्यांनाही निवेदने देण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन डे ही पाश्चात्त्य संस्कृती हद्दपार करा, अशा आशयाची पत्रके वाटप करण्यात आली.
या मोहिमेत बजरंग दलाचे महानगर सहसंयोजक श्री. समाधान पाटील, योग वेदांत सेवा समितीचे श्री. भूषण पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी सर्वश्री सुमित पंडित, प्रवीण कोळी, संदीप लोंढे यांनी सहभाग घेतला.
व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्यासाठी महाविद्यालयांना ई-मेल पाठवणार – उच्च शिक्षण संचालक
माझ्या अखत्यारित येणार्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील महाविद्यालयांना व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये, अशा आशयाचा ई-मेल पाठवीन. त्या ई-मेलला समितीच्या निवेदनाची प्रत जोडणार आहे.
यवतमाळ
वणी आणि यवतमाळ येथे पोलीस निरीक्षकांना, तसेच उपविभागीय अधिकारी, वणी तथा अप्पर जिल्हाधिकारी, यवतमाळ श्री. चंद्रकांत जाजू यांना व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृ पूजन दिन साजरा करण्यास प्रोत्साहन देेण्यासाठी निवेदने देण्यात आली.
नंदुरबार
येथेही जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप पाटील यांना, तसेच अक्कलकुवा येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस निरीक्षक श्री. के. जी. पवार यांना निवेदन दिले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अक्कलकुवा येथे निवेदन देण्यासाठी १८ धर्माभिमानी महाविद्यालयीन तरुण-तरुणीही उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात