दुबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ऑपेरा हाऊसमधून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदु मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. ‘बी.ए.पी.एस्’ संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी सध्या संयुक्त अरब अमिरातच्या दौर्यावर आहेत. हे मंदिर दगडांपासून बनवलेले अबुधाबीतील हे पहिले मंदिर असून वर्ष २०२० पर्यंत ते बांधून पूर्ण होणार आहे.
या मंदिराच्या भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये रहाणार्या भारतियांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘‘हिंदु मंदिर उभारणीस मान्यता दिल्याने मी भारतातील १२५ कोटी जनतेच्या वतीने अबूधाबीचे राजे महंमद बिन झायेद अल् नहयान यांचे आभार मानतो. हे मंदिर केवळ वास्तुशिल्पकलेचा उत्तम नमुनाच नसून ते जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देणारे आहे. अनेक दशकांनंतर भारताचे आखाती देशांसमवेतचे नाते इतके दृढ झाले आहे. भारत ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्येही प्रगती करत आहे. अबूधाबीमध्ये रहाणारे ३० लाखांहून अधिक भारतीय नागरिक येथील विकासाचे भागीदार झाले आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.’’
भारताला जगात सर्वोच्च स्थान मिळवून द्यायचे आहे ! – पंतप्रधान
भारताला जगात सर्वोच्च स्थान मला मिळवून द्यायचे आहे. २१ वे शतक हे भारताचे असेल. नोटाबंदी हे गरिबांनीही योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याचे मानले आहे. गेल्या ४ वर्षांत देशाचा आत्मविश्वास वाढला असून भारत विकासाचे नवनवे शिखर गाठतो आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात