वसई : येशूची प्रार्थना करा बहिरा ऐकू लागेल, मुकाही बोलू लागेल आणि आंधळा डोळस होईल, असे आश्वासन देत हजारो गरजूंना आपल्या मोहजालात अडकविणा-या ख्रिस्तींचा पर्दाफाश करण्यात आला आहे. प्रार्थना महोत्सवाच्या नावाखाली आपला गोरखधंदा चालविणाऱ्या आयोजकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पी. एस. रामबाबू व अंकित रामबाबू हे दोघे बंगलोरचे खिस्ती पसार झाले आहेत. यामागे धर्मांतरचे भयंकर षड्यंत्र असून त्याचा पर्दाफाश विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
वसई शहर व ग्रामीण भागात ख्रिस्ती धर्मांतराचे असे अनेक प्रकार यापूर्वीही उघड झाले आहेत. आता प्रार्थना महोत्सवाचे आयोजन करून अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात असून त्यास गोरगरीब जनता मात्र बळी पडत आहे. ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान सनसिटी मैदानावर ग्रेस जनरेशन मिनिस्टरी या संस्थेचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात पी. एस. रामबाबू व त्याचा मुलगा अंकित रामबाबू या दोघांना बेंगळुरूहून खास आमंत्रित केले होते. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात पी. एस. रामबाबू याने जमलेल्या जमावाला वशीकरण करून तुमचे सर्व रोग येशू बरा करेल, फक्त प्रार्थना करा असे सांगितले.
हजारो लोकांसमोर जाहीर चमत्कार दाखवून रामबाबू हा येशूचा जयजयकार करीत होता. तसेच हो । लोलीया असा उच्चार करीत त्याने अनेकांना संमोहित केले. एवढेच नव्हे तर प्रत्येकाकडून वैयक्तिक फॉर्म भरून घेतला. त्यावर जडलेला आजार व अडचणी लिहिण्यास सांगितले. अर्ज भरणाऱ्याकडून पैसे उकळल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रकाश लोढिया यांनी केला आहे. त्यांनी महोत्सवाचे आयोजक विकास पुजारी तसेच पी. एस. रामबाबू व अंकित रामबाबू या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फळफळे करीत असून अंधश्रद्धेच्या नावाखाली गरजूंना भुलवून त्यांचे धर्मांतर करण्याचा डाव असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
चमत्काराच्या सीडी ५० रुपयांना
सनसिटी मैदानावर झालेल्या प्रार्थना महोत्सवात पी. एस. रामबाबू या बंगलोरच्या भोंदूबाबाने आपल्या चमत्कारांच्या सीडी ५० रुपयांना विकल्या. अशाच प्रकारच्या प्रार्थना महोत्सवाचे आयोजन सात वर्षांपूर्वीही नालासोपारा येथे करण्यात आले होते.
संदर्भ : सामना