Menu Close

समलैंगिकता ही विकृती आणि अनैतिकता आहे ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांचे ठाम प्रतिपादन

टीव्ही ९ वृत्तवाहिनीवर समलैंगिक विवाहासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

टीव्ही ९ वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलतांना प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे

काही दिवसांपूर्वी मूळचा यवतमाळमधील आणि अमेरिकेत स्थायिक झालेला ऋषिकेश साठवणे आणि व्हिएतनाम या देशातील एक तरुण यांनी समलैंगिक विवाह केला. यात हिंदूंच्या विवाहात असणारे सर्व विधी करण्यात आले होते. हा प्रकार योग्य कि अयोग्य, यासंदर्भात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री. सुर्वे यांनी समलैंगिकता ही विकृती आणि अनैतिकता आहे, असे ठाम मत या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केले. विवाहाला उपस्थित असलेले ऋषिकेश यांचे मित्र स्वप्नीश दुबे, गे अ‍ॅक्टिव्हिस्ट (समलैंगिकतेला प्रोत्साहन देणारे कार्यकर्ते) दीपक कश्यप यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन श्री. विशाल पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

नैतिक शिक्षणाचा अभाव असल्याने समलैंगिकतेसारख्या विकृतीला प्रोत्साहन दिले जात आहे ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन, हे ४ नियम सांगितले आहेत. यांच्या बाहेर जाऊन करत असलेल्या कृत्यांना अप्राकृतिक किंवा अनैसर्गिक म्हणता येईल. या विवाहात जरी हिंदु धर्मातील सर्व विधी करण्यात आले असले, तरी हिंदु धर्मात समलैंगिकतेला मान्यता नाही. भारतात कलम ३७७ नुसार असे प्रकार अवैध आहेत. शाळा-महाविद्यालयांत नैतिकतेचे शिक्षण मिळत नसल्याने योग्य काय, चुकीचे काय, हे समाजाला कळत नाही. समलैंगिकतेसारख्या विकृतींना प्रोत्साहन दिले जात आहे.

श्री. नरेंद्र सुर्वे यांनी मांडलेली अन्य सूत्रे –

१. जुने विचार मागासलेले आहेत आणि नवे विचार प्रगतीशील आहेत, ही चुकीची मानसिकता पालटायला हवी. अनेक विदेशी जोडपी भारतात येऊन हिंदु धर्मानुसार विवाह करतात. लॉर्ड मेकॉलेने धर्मावर आधारित हिंदूंची पारंपरिक शिक्षणपद्धत मोडून पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धती आणली. पुढे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण वाढले. समलैंगिक विवाह करणे, यांसारख्या विकृतीतून विवाह संस्था धोक्यात येत आहे.

२. समलैंगिकता ही केवळ एक विकृती नाही, तर हा एक प्रकारचा आजार आहे. एस्एस्आर्एफ् या अध्यात्माचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन करणार्‍या संकेतस्थळावर (SSRF.org) विविध केस स्टडीज् आहेत. अशा प्रकारचे विचार येणार्‍यांनी त्यावर कशाप्रकारे प्रयत्न केले आणि समलैंगिकतेच्या विचारांतून ते बाहेर पडले, ते यात दिले आहे. वरील प्रकारच्या समलैंगिकतेच्या विवाहांच्या घटनांमधून या आजाराचा प्रचार केला जात आहे.

३. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रहित होऊ नये, असे वाटते. ते रहित केले, तर देशात मोठ्या प्रमाणात अराजक माजेल.

(म्हणे) जी तुम्हाला विकृती वाटते, तो प्रकृतीचा भाग आहे ! – दीपक कश्यप

१. हिंदुत्व हा एका प्रकारचा धर्म नसून जेवढे हिंदू आहेत, तेवढ्या प्रकारचा हिंदु धर्म आहे. ऋग्वेदात असे लिहिले आहे की, प्रकृती हीच विकृती आहे. जी तुम्हाला विकृती वाटते, तो प्रकृतीचा भाग आहे. तुम्हाला काय प्रत्येक दिवशी प्रकृती भ्रमणभाष लावून सांगते का, की हे प्राकृतिक आहे ? पण ऋग्वेद असे सांगते की, जे प्रकृतीमध्ये आहे, ते प्राकृतिक आहे. जे स्वभावात आहे, ते स्वाभाविक आहे. (हिंदु धर्मात कोठेही समलैंगिकतेला प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. असे असतांना शब्दच्छल करून हिंदूंची दिशाभूल करणे, हे निषेधार्ह आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. प्रत्येक जनावर, माणूस सारखा नाही. ९७ टक्के प्राण्यांमध्ये समलैंगिकता आढळते; पण याच्याविरोधी विचार केवळ माणसांमध्ये आहे. (जनावरे आणि मनुष्य यांत भेद आहे.  योग्य आणि अयोग्य यांची जाण मनुष्याला आहे; म्हणून मनुष्याने संस्कृती विकसित केली आहे. समलैंगिकता ही विकृतीच असून विवेकबुद्धी असणार्‍यांच्या हे सहजपणे लक्षात येऊ शकते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. आपल्याकडे विवाह म्हणजे २ आत्म्यांचा संबंध सांगितला गेला आहे. दोन शरिरांचा संबंध नाही. (सोयीनुसार धर्माचा आधार घेणारे कश्यप ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. समलैंगिकता ही एक जीवशास्त्रीय गोष्ट आहे. ती दाबल्याने अधिक त्रास होतो. यातून कोणाला हानी नाही, हे समजून घ्यायला हवे. जर मी ब्रह्मचर्याला प्रोत्साहन दिले आणि सर्व ब्रह्मचारी झाले, तर मुले कुठून जन्माला येणार ? ब्रह्मचर्य ही गोष्ट मान्य आहे, तर समलैंगिकता ही गोष्ट का मान्य नाही ?

हिंदु धर्म इतका मोठा आहे आणि आपण त्यातील गोष्टी आपल्या सोयीनुसार निवडत आहोत. (कश्यप यांची सदर विधाने धर्माविषयी समाजात किती मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे, हेच दर्शवतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

समलैंगिक विवाह करणारे ऋषिकेश साठवणे यांचे मित्र स्वप्नीश दुबे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

या विवाहात मला वेगळे काहीच वाटले नाही. नेहमीचेच धार्मिक विधी होते. केवळ वधूची जागा पालटली होती. तेच आनंद, तेच प्रेम होते. एक हिंदी भाषिक जोडपे सांगत होते की, हे प्रगतीशील जोडपे आहे. आपण या पद्धतीने पुढे जाणार आहोत. तेथील लहान मुलांनाही विवाहातील वेगळेपणा समजावून सांगण्यात येत होता. (महान हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात आल्याने विदेशी त्याचे आचरण करत आहेत; मात्र पाश्‍चात्त्य  विकृतीच्या प्रभावाखाली आलेल्या हिंदूंना याचे मोल नसल्याने दिव्याखाली अंधार याप्रमाणे त्यांची स्थिती झाली आहे. हे चिंताजनक असून येणार्‍या पिढीमध्ये तरी धर्मशिक्षण रुजावे, यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *