अकोला आणि खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील अधिवक्त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !
अकोला : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी अकोला आणि खामगाव येथील अधिवत्यांसमवेत बैठक घेतली. त्याला १२ अधिवक्ते उपस्थित होते. बैठकीसाठी अधिवक्ता श्री. उदय आपटे खामगाव यांनी पुढाकार घेतला. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या कौशल्याचा राष्ट्र आणि धर्म यांसाठी उपयोग व्हावा, तसेच अधिवक्त्यांनाही धर्मशिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक मासातून एकदा बुलढाणा जिल्ह्यातील अधिवक्त्यांसाठी बैठक ठरवली आहे.
अकोला येथे झालेल्या अधिवक्त्यांच्या बैठकीत बार असोसिएशनमध्ये सचिवपदी निवड झालेले अधिवक्ता श्री. सुहास राजदेरकर यांना ‘मालेगाव बॉम्बस्फोटातील अदृश्य हात’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. अकोला बार असोसिएशनकडून कायदेविषयक लागणारे सर्व प्रकारचे साहाय्य करणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी ९ अधिवक्ते उपस्थित होते.
अकोला अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. सत्यनारायण जोशी यांचीही भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेचा ‘धर्मांतर’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच’, असे अधिवक्ता श्री. अमितकुमार व्यास यांनी सांगितले.
ब्राह्मण संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सभा घेऊया – उदय महा, प्रदेश ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष
प्रदेश ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. उदय महा यांचीही श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. त्या वेळी श्री. महा यांनी ब्राह्मण संघटना आणि समिती यांच्या वतीने सभा घेण्याविषयी सांगितले. श्री. उदय महा यांनी अनेक ठिकाणी धर्महानी रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पत्नी सौ. हेमा महा या विश्वमांगल्य महिला संघटनेच्या अकोला जिल्हाप्रमुख आहेत.
राष्ट्र-धर्मकार्यात कृतीशील होण्यास मान्यवर इच्छुक
श्री. राधेश्याम चांडक (भाईजी) बुलढाणा अर्बन को ऑप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या महाराष्ट्रासह १२ राज्यांत ४०० हून अधिक शाखा आहेत. ते अध्यात्ममार्गी असून त्यांनी वेदविद्यालय चालू केले आहे. त्यांच्याकडे २२ विद्यार्थी अध्ययन करतात. सनातनचे आणि समितीचे कार्य त्यांनी समजून घेऊन सांगितले, ‘‘मीसुद्धा हिंदुत्वाचे विचार प्रखरतेने मांडतो.’’ त्यांनी सनातनच्या आश्रमालाही भेट देणार असल्याचे सांगितले.
अधिवक्ता आशिष केसाळे यांनी न्यायाधिशांकडून येणार्या अडचणींविषयी साहाय्य करणार असल्याचे सांगून अधिवक्त्यांची बैठक आयोजित करण्याचेही आश्वासन दिले.
स्वामी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आत्मनंदजी थोरहाते म्हणाले, ‘‘सनातन संस्था आणि समिती यांचे कार्य एकत्रितपणे करू. कधीही साहाय्य लागल्यास तुम्ही सांगू शकता.’’ तेथील वसतीगृहातील मुलांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज हे आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
वर्धा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या घेतलेल्या सदिच्छा भेटी
वर्धा : श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय सचिव आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. गणपती प्रधान, तसेच गोरक्षक समितीचे आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. पवन गोहत्रे याची भेट घेतली. श्री. प्रधान यांना समितीच्या कार्याविषयीही विश्वास आहे. ‘वैद्यकीय क्षेत्र, पेट्रोल पंप, न्याय, राजकीय, शासकीय व्यवस्था येथील अपप्रकार थांबावेत’, असे त्यांना वाटते.
धार्मिक क्षेत्रातील अपप्रकार, विडंबन, फसवणूक हे थांबवण्यासाठी त्यांनी समितीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यांना सनातनचा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. श्री. पवन गोहत्रे ‘जागो हिंदू’चे संदेश धर्मप्रेमींना पाठवतात. त्यांनी गावात धर्मसभा घेण्याचे दायित्व स्वीकारले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात