Menu Close

धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या डॉ. तात्याराव लहाने समितीच्या निष्क्रीयतेवर शासनाची अनास्था !

  • सुराज्य अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या पुणे, जळगाव आणि नगर येथे पत्रकार परिषदा

  • हिंदु जनजागृती समिती आंदोलन करणार

जे हिंदु जनजागृती समितीच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या सरकारच्या लक्षात का येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पुण्यातील पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ता मोहनराव डोंगरे, श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि अधिवक्ता नीलेश निढाळकर

पुणे : सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा एकप्रकारे गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणार्‍या उपचारांची गुणवत्ता, उपचार करतांना येणार्‍या अडचणी, उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, औषधांचे दर, तसेच योजनेकरता खाटा राखीव ठेवण्यात येतात कि कसे, याची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २८.५.२०१४ च्या शासन निर्णयाद्वारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली.

या तज्ञांच्या समितीने त्रैमासिक शिफारस वजा अहवाल महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना, तसेच या अहवालाची प्रत शासनास सादर करणे बंधनकारक होते. असे असतांना गेल्या ३ वर्षांत या समितीने एकही बैठक घेतलेली नाही, एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही, तसेच एकही अहवाल सादर केलेला नाही. अशा निष्क्रीय समितीवर शासनाचा काही अंकुश आहे का ? शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी चेतावणी समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी १५ फेब्रुवारीला पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अधिवक्ता मोहनराव डोंगरे आणि अधिवक्ता नीलेश निढाळकर हेही उपस्थित होते. याच विषयावर जळगाव आणि नगर येथेही पत्रकार परिषदा घेण्यात आल्या.

जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, सौ. क्षिप्रा जुवेकर आणि सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रय वाघुळदे उपस्थित होते. नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखडे आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर यांची उपस्थिती होती.

हिंदु जनजागृती समितीने स्वतः पुढाकार घेऊन एप्रिल आणि डिसेंबर २०१७ मध्ये राज्यशासन साहाय्यीत धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तेथे शासकीय योजनेची प्रसिद्धी होते किंवा कसे, याचा अभ्यास केला. त्या वेळी बर्‍याच रुग्णालयांत शासकीय योजनेची प्रसिद्धी होत नसल्याचे लक्षात आले. या पार्श्‍वभूमीवर या तज्ञ डॉक्टरांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहोत, तसेच या विरोधात आंदोलनही करणार आहोत, असे श्री. धर्माधिकारी यांनी सांगितले.

शासनाने या समितीत कार्यक्षम अशा तज्ञांची नव्याने नियुक्ती करावी, या समितीच्या कार्याचा आढावा शासनाने वेळोवेळी घ्यावा, या समितीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या समितीचा कार्यआढावा, चौकशी अहवाल आणि केलेली कारवाई प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस द्यावी, सामान्य रुग्णांच्या तक्रारी धर्मादाय रुग्णालयांकडून सोडवल्या जात नसल्यास त्या रुग्णांना या तज्ञांच्या समितीकडे थेट तक्रारी करता याव्यात, यासाठी व्यवस्था निर्माण करावी आदी मागण्या हिंदु जनजागृती समितीने केल्या आहेत.

या वेळी अधिवक्ता मोहनराव डोंगरे म्हणाले की, निष्क्रीय असणारी डॉ. लहाने समिती विसर्जित करून सचोटीने काम करणार्‍या डॉक्टरांची नवीन समिती स्थापन करावी. गरीब रुग्णांनाही सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे.

अधिवक्ता नीलेश निढाळकर म्हणाले की, अपप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने खरे तर त्यांची नैतिकता जपायला हवी. त्यांनी कामकाजात सुधारणा सुचवायला हव्यात. सार्वजनिक आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *