Menu Close

सहकार खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे काजू उत्पादकांची नाहक हानी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

  • हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार उघड

  • हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाची चेतावणी

जे हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या सरकारच्या लक्षात का येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. संदेश गावडे, बोलताना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि डॉ. संजय सामंत

सावंतवाडी : तालुक्यातील ‘सह्याद्री काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित’ या केवळ ४६८ सभासद असलेल्या संस्थेमध्ये सरकारने ३ कोटी ५५ लाख २० सहस्र इतकी प्रचंड गुंतवणूक केली आहे. यासाठी तारण म्हणून घेतलेली भूमी यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून असल्याची नोंद आहे. म्हणजेच तारण ठेवलेल्या भूमीवरच पुन्हा कर्ज घेणे, हा एक घोटाळाच आहे, वर्ष २०१२ पासून संस्थेच्या कारभाराचा एकही अहवाल सिद्ध केलेला नाही.

हे सर्व प्रकार पहाता सहकार खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांची नाहक हानी होत आहे, असा आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी १५ फेब्रुवारीला येथे पत्रकार परिषदेत केला. येथील हॉटेल मँगोमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. संजय सामंत आणि श्री. संदेश गावडे उपस्थित होते.

या वेळी अधिवक्ता इचलकरंजीकर पुढे म्हणाले,

१. शहरातील सह्याद्री काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित या केवळ ४६८ सभासद असलेल्या संस्थेमध्ये सरकारची गुंतवणूक पाहिली, तर ती ३ कोटी ५५ लाख २० सहस्र इतकी प्रचंड आहे.

२. या रकमेची परतफेड करण्यासाठी संस्थेकडून तारण म्हणून १६० गुंठे भूमी पडवे-माजगाव येथील घेतली आहे. या भूमीचा सात-बारा पाहिला असता, त्यावर आधीच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा-कोलझर) यांच्याकडून एकूण २ कोटी ४५ लाखांचे कर्ज घेतल्यापोटी ती भूमी तारण असल्याची नोंद आहे.

३. तारण भूमीचे मार्च २०१५ नुसार मूल्य साधारण १ कोटी ६० लाख रुपयांच्या आसपास होते. म्हणजेच सर्व भूमी विकली, तरी शासनाच्या अडकलेल्या रकमेच्या निम्मी रक्कमही येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

४. शासनाचा म्हणजे एका अर्थाने जनतेचाच पैसा सहकाराच्या नावाखाली गुंतून पडला आहे. ज्या उद्देशाने कारखान्यात शासनाने इतक्या मोठ्या रकमा गुंतवल्या आहेत, तो उद्देशच साध्य होत नाही.

५. या कारखान्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवून सहकार खात्याचे सहनिबंधक, उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक इत्यादींनी प्रतिमाह बैठक घेऊन कामकाजावर चर्चा करणे अपेक्षित होते, प्रतिमाह त्याचा अहवाल पाठवणे अपेक्षित होते; परंतु वर्ष २०१२ पासून म्हणजेच आरंभीपासून आजपर्यंत असा एकही अहवाल बनवलेलाच नाही. याचा अर्थ सहकार खाते झोपा काढत आहे.

शासन आणि काजू उत्पादक यांची हानी करणार्‍यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

जिल्ह्यात काजू उत्पादक मोठ्या प्रमाणात असतांना अशा पद्धतीने प्रकल्पांवर देखरेख न ठेवून शासन आणि काजू उत्पादक यांची दुहेरी हानी करणार्‍यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा कारवाई होईपर्यंत आंदोलन छेडण्यात येईल. राज्यातील सर्व भागांमध्ये विकासासाठी समान प्रयत्न करणे, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य आहे; मात्र कोकणविषयी असे होतांना दिसून येत नाही. या प्रकरणी समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असून काजू उत्पादक, तसेच या आंदोलनात सहभागी होणारे यांनी ९४२२४३५०१९ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीचे डॉ. संजय सामंत यांनी या वेळी केले.

पत्रकार परिषदेची पोलिसांकडून चौकशी

या पत्रकार परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर १४ फेब्रुवारीला रात्री पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला संपर्क करून, ‘तुम्ही कसला घोटाळा बाहेर काढणार आहात ?  पत्रकार परिषद कोण घेणार आहे ?’, असे प्रश्‍न विचारले.

अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतो, मग तुम्ही एकाच आस्थापनाला लक्ष का करता ? – पत्रकार परिषदेत पत्रकारांचा प्रश्‍न

या वेळी एका पत्रकाराने विचारले, ‘भ्रष्टाचार अनेक ठिकाणी होतो; मग तुम्ही एकाच आस्थापनाला (कंपनी) का लक्ष्य (टार्गेट) केले ? तुमचा त्यांच्याशी काही पूर्वग्रह आहेत का ?’

यावर अधिवक्ता इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. समितीने आजपर्यंत सामाजिक प्रश्‍नावर बरीच आंदोलने केली आहेत. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करणार्‍यांचे पितळ उघडे पाडले आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील भ्रष्टाचार हे एक उदाहरण आहे. जिल्ह्यात अजून बर्‍याच ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे. हा प्रारंभ आहे, अजून काही प्रकरणे बाहेर काढली जातील.

(या संदर्भातील सविस्तर लेख रविवारच्या अंकात प्रसिद्ध करत आहोत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

नगर येथेही पत्रकार परिषद

डावीकडून कु. प्रतिक्षा कोरगावकर आणि श्री. अमोल वानखडे

नगर येथील यश पॅलेस हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता पत्रकार झालेल्या या पत्रकार परिषदेला १३ हून अधिक पत्रकार उपस्थित होते.

क्षणचित्र

‘एका प्रथितयश आस्थापनाची पत्रकार परिषद याच वेळेस अन्य ठिकाणी चालू असतांनाही इतके पत्रकार येणे, ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे’ असे उद्गार एका धर्मप्रेमी पत्रकाराने परिषदेनंतर अनौपचारिक चर्चेत काढले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *