तल्लुरू (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा
तल्लुरू (कर्नाटक) : मनुष्याने कसे जगले पाहिजे, हे धर्म आपल्याला सांगतो. संस्कृती आणि धर्माचरण यांच्याविषयी भारत आजही विश्वात उन्नत स्थानी आहे; परंतु आज आपल्या प्रत्येक आचरणात अवैज्ञानिक पालट होत आहेत. दुष्प्रवृत्ती आपल्या प्रत्येक दैनंदिन कृतींमध्ये घुसत असून त्याविरुद्ध आपण सर्वांनी लढा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत स्वाभिमान ट्रस्टचे श्री. दिवाकर भट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीमहादेवी कुंतीअम्मा देवस्थानच्या आवारात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर आणि समितीचे श्री. मोहन गौडा व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. भट पुढे म्हणाले, मनुस्मृतीत कुठेही जातींचा उल्लेख नाही. केवळ वर्णाचा उल्लेख आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या आपल्या देशातील सरकारी व्यवस्थेमुळेच जातीय आधारावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी आपण अर्जांमध्ये जातीचा उल्लेख नसावा, असा आग्रह धरणे आवश्यक आहे.
धर्म टिकला, तरच राष्ट्र टिकेल ! – सौ. विदुला हळदीपूर
धर्माचरण आणि धर्मरक्षण या विषयावर बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर म्हणाल्या, वर्ष १८५७ मध्ये ब्रिटिशांनी इंडियन आमर्स अॅक्टद्वारे आपली शस्त्रे काढून घेतली. त्यानंतर १९२० मध्ये गांधींनी आपल्या मनातील शस्त्रे काढून घेतली. त्यानंतर धर्मच आत्मा असलेल्या आम्हा बहुसंख्य हिंदूंवर आज निरंतर लव्ह जिहाद, धर्मांतर, अशा विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. धर्म टिकला, तरच राष्ट्र टिकेल. यासाठी आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे अन् इतरांना त्यासाठी उद्युक्त करणे आवश्यक आहे.
हिंदूंना सन्मानाने जगता येण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – श्री. मोहन गौडा
हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर बोलतांना श्री. मोहन गौडा म्हणाले, वर्ष १९४७ मध्ये केवळ २४ टक्के लोकांसाठी पाकिस्तान निर्माण केले गेले; परंतु ७६ टक्के असलेल्या बहुसंख्य हिंदूंना हिंदु राष्ट्र मिळाले नाही. आज सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांतील अनेक कार्यक्रम अन्य पंथियांच्या पुढाकाराने होतात. तेथे अन्य पंथीय कामाला आहेत. भक्तांनी मंदिरात श्रद्धेने अर्पण केलेल्या धनातील २५ टक्के रक्कम सरकार मंदिरांसाठी, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम इतर कामांसाठी वापरते. आज देव-धर्माच्या संदर्भात अंधश्रद्धेची एकही तक्रार राज्यातील एकाही पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेली नसतांना कर्नाटक सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला. हिंदूंच्या धार्मिक आचरणासाठी लागू होणारा हा कायदा अन्य पंथियांसाठीही लागू होणार आहे का ? एकप्रकारे हे हिंदूंवर दबाव आणण्याचे षड्यंत्र आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आणि हिंदूंना सन्मानाने जगता येण्यासाठी समस्त हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करावीच लागेल.
सभेचा प्रारंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांनी करण्यात आला. त्यानंतर समितीचे श्री. विजयकुमार यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. या सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. स्थानिक हिंदु संघटनांचे सदस्य मोठा भगवा ध्वज घेऊन गटागटाने सभेला येत होते.
२. एक स्थानिक ग्रामपंचायत सदस्या सलग ३ दिवस प्रसारसेवेत सहभागी झाल्या होत्या. सेवेच्या संदर्भात त्यांना अनेक सूत्रे शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
३. एक स्थानिक धर्मप्रेमी सभेच्या सेवेत सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात