पुणे : विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक सिद्ध होते. या पाठ्यपुस्तकासाठी एक समिती असते. समितीतील अनेक जण पुस्तक निर्दोष होण्यासाठी प्रयत्न करतात. असे असतांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेच्या (एन्.सी.ई.आर.टी.च्या) पुस्तकांत महाराष्ट्रातील संतांची नावे चुकीची कशी प्रसिद्ध होतात ? या चुका मोठ्या आहेत. ज्या पुस्तकांत संतांचा एकेरी आणि चुकीचा उल्लेख आहे, ज्या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचे नाव नाही, अशा पुस्तकांतून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यायचे ? राष्ट्रभाषेतील पुस्तक लक्षावधी विद्यार्थ्यांकडे जाते. त्यामुळे असा चुकीचा इतिहास शिकवल्यास हेच विद्यार्थी पुढे स्पर्धा परीक्षांसाठी बसल्यावर ते उत्तीर्ण कसे होतील ? या सगळ्या चुकांसाठी नेमके उत्तरदायी कोण ? या चुकांच्या विरोधात दाद कुणाकडे मागायची ? आजपर्यंत अन्य पुस्तकांमध्येही एन्.सी.ई.आर.टी.ने गंभीर चुका केल्या आहेत. मुलांपुढे मोगलांचा इतिहास ठेवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दडपणे, असे प्रकार केले आहेत. निदान भाजप शासनाच्या काळात तरी असे घडणार नाही, अशी अपेक्षा होती. अशा चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होते. याविषयी शासनाने तातडीने लक्ष घालून एन्.सी.ई.आर.टी.कडून मनमानी इतिहास प्रसिद्ध होणार नाही, याकडे पाहिले पाहिजे, असे मत पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी व्यक्त केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात