-
पाचगणी (जिल्हा सातारा) येथील ‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’चे धर्मांतराचे षड्यंत्र उघड !
-
बहाई पंथ स्वीकारल्यास शुल्क माफ करण्याचे आमीष
-
धर्मांतरास नकार देणार्या हिंदु विद्यार्थ्यांचे साहित्य वसतीगृहाबाहेर फेकून दिले
शिक्षण संस्थांमध्ये चालू असलेले हे प्रकार लांच्छनास्पद आहेत ! अशा शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना कोणती शिकवण देणार ? हे प्रकार थांबवण्यासाठी अशा शिक्षणसंस्थांवर तात्काळ बंदी घालणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सातारा : पाचगणी (तालुका महाबळेश्वर) येथील ‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’मध्ये बहाई पंथ स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांनी २ लक्ष ३४ सहस्र शुल्क तातडीने भरावे अथवा धर्मांतर करावे, असा तगादा लावण्यात आला आहे. १ लक्ष १० सहस्र रुपये शुल्क भरूनही विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक आर्थिक आणि शैक्षणिक हानी केली जात आहे. या प्रकरणी ट्रेनिंग स्कूलमधील दोषी व्यवस्थापक, शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विनायकराव पावसकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. धर्मांतर करण्यास नकार दिल्याच्या कारणाने ट्रेनिंग स्कूलमधून बाहेर काढण्यात आलेले पीडित हिंदु विद्यार्थी
श्री. जितेश परमार आणि कु. रविता परमार यांनी त्यांची व्यथा पत्रकारांपुढे मांडली.
श्री. विनायकराव पावसकर पुढे म्हणाले,
१. या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी धर्मांतर करून बहाई पंथ स्वीकारल्यास अर्धे शुल्क माफ करण्याचे आमीष दाखवले जाते.
२. तसे न करणार्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणे, तसेच धमकावणे, असा छळ करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारीपासून वर्गात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
३. पीडितांसाठी निवासी विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह बंद करण्यात आले असून या हिंदू विद्यार्थ्यांवर रस्त्यावर रहाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
४. १५ मार्चपर्यंत शुल्क भरण्यास अवधी असतांनाही धर्मांतर न केल्याचा राग मनात ठेऊन ‘शुल्क न भरल्यास तुम्ही इथून जिवंत परत जाणार नाही’, असे धमकावण्यात येत आहे.
५. संस्था संचालक शेरॉम आणि कतार या देशांतून आलेल्या सेवामिस यांच्या सांगण्यावरून सर्व चालू असल्याचे समजते.
६. वर्ष २०११ मधे याच संस्थेविरोधात बहाई पंथाचा प्रसार केल्याच्या प्रकरणी तक्रार झाली होती. त्यानंतर संस्थेने माफीनामा लिहून दिला होता; मात्र अजूनही हे प्रकार चालूच आहेत. (तेव्हाच याविरोधात कठोर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
७. याप्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून हिंदु विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा हिंदू एकता आंदोलनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
‘पैशाचे लालूच दाखवून, तसेच बळाचा वापर करून धर्मांतरास भाग पाडणे आणि आपल्या पंथाची लोकसंख्या वाढवणे, पंथविस्तार करणे, हे यामागील षड्यंत्र आहे’, असे हिंदू एकता आंदोलनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे यांनी या वेळी सांगितले.
‘बहाई पंथा’चा इतिहास
वर्ष १८६३ मध्ये बहाउल्ला यांनी इराण या मुसलमानबहुल राष्ट्रात या पंथाची स्थापना केली. इराणमधून बाहेर काढल्यावर त्यांनी स्वत:ला प्रेषित घोषित केले. सद्यःस्थितीत बहाई पंथाचे जगातील सर्वाधिक लोक भारतात आहेत. (संदर्भ : वीकिपीडिया)
‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’ मध्ये चालू असलेले हिंदु विद्यार्थ्यांचे दमन !
१. संस्थेतील विद्यार्थ्यांना सायंकाळी ६ नंतर बहाई पंथाच्या प्रसारासाठी जाण्यास भाग पाडले जात आहे. यासाठी ट्रेनिंग स्कूलच्या तासिकांच्या नियोजनातही पालट केला जातो. प्रसार न केल्यास शिक्षा म्हणून ५०० रुपये दंड वसूल करणे, तसेच धमकावणे, अशा प्रकारे शोषण केले जात असल्याचे पीडित विद्यार्थ्यांनी नमूद केले.
२. वसतीगृहातील माझ्या खोलीतील देवतांच्या प्रतिमा शिक्षकांनी फाडून टाकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘टी शर्ट’ परिधान केलेल्या मुलांवर मराठा गटबाजी करत असल्याचा आरोप करून तसे शर्ट घालण्यावर बंदी घालण्यात आली. माझ्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी केली. नकार दिल्यावर वसतीगृहातून बाहेर काढले. घरी जाण्यासाठीही पैसे नसल्याने मित्रांचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न केला; मात्र शिक्षकांनी मित्रांशीही बोलू दिले नाही. आमच्या जीवितास संस्थेमध्ये धोका निर्माण झाला आहे. – श्री. जितेश परमार, ट्रेनिंग स्कूलमधील पीडित हिंदु विद्यार्थी
३. धर्मांतराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यावर बाहेर जाण्यास सांगितले. १२ फेब्रुवारीला मैत्रिणींच्या साहाय्याने साहित्य बांधत असतांना प्राची गुप्ता या शिक्षिकेने मैत्रिणींना मला साहाय्य करण्यापासून रोखले. अर्ध्या सामानासह बॅग वसतीगृहाबाहेर फेकली. महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे यांसह बरेच साहित्य वसतीगृहात राहिले आहे. या संस्थेचे व्यवस्थापन आणि शिक्षक यांनी धर्मांतरासाठी कट रचला आहे. – कु. रविता परमार, ट्रेनिंग स्कूलमधील पीडित हिंदु विद्यार्थिनी (श्री. जितेश परमार आणि कु. रविता परमार हे भाऊबहीण असून आग्रा (उत्तरप्रदेश) येथून शिक्षणासाठी पाचगणी येथे आले आहेत.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात