-
धर्मादाय रुग्णालयांतील शासकीय योजनांच्या पूर्ततेच्या पडताळणीसाठी नेमलेल्या डॉ. लहाने समितीचे प्रकरण
-
हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई आणि सोलापूर येथे पत्रकार परिषदा
जे हिंदु जनजागृती समितीच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या सरकारच्या लक्षात का येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत, उपचारांमध्ये येणार्या अडचणी, उपचारांचे शुल्क, औषधांचे दर, राखीव खाटा इत्यादींची पडताळणी करून त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ही समिती रहित न केल्यास आंदोलन करणार असल्याची चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.
याविषयी मुंबई आणि सोलापूर येथे पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. विजय जंगम (स्वामी), भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर हे उपस्थित होते.
सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अभय कुलकर्णी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.
डॉ. उपेंद्र डहाके म्हणाले की, गरीब रुग्णांना सरकारने दिलेल्या सुविधांविषयी माहिती नसते. ते सरकारी रुग्णालयात जिथे गर्दी असते, तिथे जातात. त्यांना या सुविधांविषयी माहिती झाल्यास ते इतर रुग्णालयांकडे वळतील. त्यामुळे सरकारी रुग्णालयांतील दाटी अल्प होईल. डॉ. लहाने समिती ही केवळ कागदोपत्री स्थापन केलेली निष्क्रीय समिती आहे. समाजात कितीतरी चांगले आधुनिक वैद्य आहेत की, जे समाजात जाऊन नि:स्वार्थीपणे समाजसेवा म्हणून गरिबांवर उपचार करतात. सरकारने त्यांना समितीमध्ये घ्यावे किंवा समाजाला चांगल्या आधुनिक वैद्यांची माहिती देण्यासाठी आवाहन करावे. जे आधुनिक वैद्य या सुविधांचा लाभ घेऊन रुग्णांना शासनाच्या सुविधा देत नाहीत, त्यांचा नोंदणी क्रमांक आणि दिलेल्या सुविधा रहित कराव्यात.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी सांगितले की, मोठी रुग्णालये सरकारकडून सुविधा घेतात; परंतु सुविधेचा लाभ रुग्णांना न देता व्यवसाय म्हणून करतात. यासाठी सरकारनेच आता गरीब रुग्णांसाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. विजय जंगम (स्वामी) म्हणाले की, शासनाने उच्च न्यायालयाने सांगितले म्हणून समिती स्थापन केली आहे. मोठमोठ्या शस्त्रक्रिया धर्मादाय रुग्णालयांकडून विनामूल्य केल्या जाऊ शकतात; परंतु ही रुग्णालये नोंदणी करून शासनाकडून निधी घेऊन त्याचा लाभ गरिबांना देत नाहीत. बाह्यरुग्ण विभाग केवळ दाखवण्याकरिता स्थापन केला जातो आणि इतर विभागांत भरमसाठ शुल्क आकारले जाते. धर्मादाय रुग्णालय नियमांचे पालन करतात कि नाही यासाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालायला हवे.
सोलापूर : येथे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अभय कुलकर्णी यांनी शासनाने या समितीत कार्यक्षम अशा तज्ञांची नव्याने नियुक्ती करावी, या समितीच्या कार्याचा आढावा शासनाने वेळोवेळी घ्यावा, या समितीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या समितीचा कार्यआढावा, चौकशी अहवाल आणि केलेली कारवाई प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस द्यावी, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात