मुंबई आणि सांगली येथे शासनाच्या अनास्थेविषयी सुराज्य अभियानातून जनजागृती !
मुंबई : सरकारने धर्मादाय रुग्णालयांना अल्प मूल्यात भूमी दिल्या आहेत; जेणेकरून गरीब रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय सुविधा सवलतीच्या दरात मिळाव्यात; परंतु सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणर्या उपचारांची गुणवत्ता, उपचार करतांना येणार्या अडचणी, उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, औषधांचे दर, तसेच योजनेकरता खाटा राखीव ठेवण्यात येतात कि कसे, याची पडताळणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २८.५.२०१४ च्या शासन निर्णयाद्वारे डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. या तज्ञांच्या समितीने त्रैमासिक शिफारस अहवाल ना शासनाला सादर केला ना समितीची बैठक घेतली. तसेच एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही, अशा निष्क्रिय समितीवर शासनाचा काही अंकुश आहे का ? त्यामुळे ती रहित करायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाअंतर्गत दादर (पश्चिम) येथील कबुतरखाना येथे १७ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आंदोलनात ते बोलत होते. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
साईलीला मित्र मंडळाचे श्री सचिन घाग म्हणाले, सरकारने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा सामान्य नागरिकांना उपयोग व्हाल हवा. प्रभु रामचंद्राने एका सामान्य नागरिकांसाठी सीतेचा त्याग केला. आम्हाला भांडुप ते दुर्गाडी किल्ला अशी शिवछत्रपतींची पालखी नेण्यासाठी पोलीस, प्रशासन यांना कितीतरी विनंती अर्ज करावे लागतात. योग्य मार्गाने घटनेने दिलेल्या अधिकारांचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समिती करते. छत्रपतींच्या हिंदवी राष्ट्रासारखी लोकशाही हवी.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता डॉ. विजय जंगम म्हणाले की, सध्या वैद्यकीय क्षेत्र भ्रष्टाचाराने ग्रासलेले आहे. सामान्य मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या रुग्णालयामध्ये जातो. त्यांना सरकारने गरीब रुग्णांसाठी केलेल्या शासकीय योजनांची माहिती नसते. धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा फलक रुग्णालयाबाहेर लावला पाहिजे; परंतु तसे घडत नाही. उच्च न्यायालयाने रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविषयी सरकारला निर्देश दिले आहेत. लीलावती, हिंदुजा, जसलोक ही धर्मदाय रुग्णालये असून त्यांच्याकडून गरीब रुग्णांना शासकीय सुविधा दिल्या जातात कि याची पडताळणी समितीने केलेली नाही. डॉ. लहाने चांगले असले तरी त्यांना कार्यबाहुल्यामुळे वेळ नसल्यास त्यांनी समितीचा राजीनामा द्यायला हवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात